पालघर जिल्ह्यात कर्जमाफी १०३ कोटींची

By admin | Published: June 13, 2017 03:14 AM2017-06-13T03:14:27+5:302017-06-13T03:14:27+5:30

राज्यातील शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्या नंतर राज्य सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी

103 crore of loan waiver in Palghar district | पालघर जिल्ह्यात कर्जमाफी १०३ कोटींची

पालघर जिल्ह्यात कर्जमाफी १०३ कोटींची

Next

- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : राज्यातील शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्या नंतर राज्य सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली असून ती नुसार पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांचे सुमारे १०३ कोटी ६५ लाखांचे कर्ज माफ केले जाणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसह शेतमालास हमी भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर आंदोलने सुरु होती. त्यांना व शेतकरी संपास राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सुकाणू समितीसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाच्या मागण्या तत्वत: मान्य केल्या. या निर्णयात सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य केली असून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ होणार असल्यामुळे या निर्णयाचे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही स्वागत केले.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे खरीप किंवा रब्बी कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेचा पर्याय निवडतात. त्यामुळे हे कर्जवाटप इतर बँकांच्या तुलनेत ठाणे जिल्हा सहकारी बँके मार्फत मोठ्या प्रमाणात वितरित केले जाते तसेच ठाणे जिल्हा बँकेस ह्या कर्जासाठीचा लक्ष्यांकही मोठा आहे असे बँकेने उपलब्ध करून दिलेल्या माहिती वरून दिसते आहे. कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्ह्यात ठाणे जिल्हा बँकेकडून वितरित केलेल्या १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना सुमारे १ हजार लाख (१०३.६५ कोटी) रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.यामध्ये जिल्हा बँकेकडून ५० हजार ते १ लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३७५४ अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुमारे २४.६१ कोटी तर ६६५३ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सुमारे ४३.७३ कोटी व २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या अशा ५२५९ शेतकऱ्यांना सुमारे ३५.३१ कोटी अशी सर्व मिळून १५६६६ शेतकऱ्यांना १०३.६५ कोटीची कर्जमाफी मिळणार आहे.
यामधील अल्प व अत्यल्प भूधारकांचे कर्ज या निर्णयामुळे तातडीने माफ होणार आहेत व इतरांच्या कर्जमाफीस तत्वत: मान्यता देण्यात आल्याने ती प्रत्यक्ष कधी मिळेल हे सरकारच्या निर्णयानंतरच कळू शकणार आहे.

वाड्यात भातपेरणीला सुरुवात गुजरात ४ व ११ बियाणांची टंचाई
वाडा: यंदा पावसाने वेळेवर सुरवात केल्याने शेतकरी राजा सुखावला असून त्याने भात पेरणीला सुरु वात केली आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र पेरणीचे चित्र दिसत आहे. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यात झीनी, गुजरात ४, गुजरात ११, सुरती, पुनम, कर्जत, रत्ना, जया या भाताच्या वाणाची लागवड यंदाही मोठ्या प्रमाणात होणार आहे.
तालुक्यात सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. तालुक्यातील काही शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. मल्चिंग पध्दतीने काही शेतकऱ््यांनी भातशेती सुरू केली आहे. तर काही शेतकरी पेर भात करीत आहेत. बी बियाणे, खते व औषधांचे वाढते दर, मजूरांची कमतरता, यांत्रिक उपकरणांचे वाढते दर यामुळे अन्य शेती करणे परवडत नसल्याने भातशेतीला पसंती मिळत आहे.
भातशेती सध्या करणे परवडत नसल्याने शेतकरी आता फक्त स्वत:ला वर्षभर पुरेल एवढीच शेती करताना दिसत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी रोगाची लागण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात जास्त प्रमाणात गुजरात ४ व ११ या भाताच्या वाणाची बहुतांशी शेतकरी लागवड करतात. मात्र या भाताचे वाण शासनाच्या कृषी विभागाकडे मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

वाड्यात युरियाचा तुटवडा
वाडा : तालुक्यात पावसाने चांगली सुरवात केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या उरकून घेतल्या आहेत. तालुक्यातील काही भागात ६ ते ८ दिवस झाले आहेत. मात्र आता रोप वाढिसाठी लागणारे यूरिया खत मिळत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहेत. याबाबत कृषी खात्याकडे कोणतेही उत्तर नाही. तर व्यापारी मौन बाळगून आहेत. त्याचवेळी काळयाबाजारात मात्र युरीया उपलब्ध आहे अशा स्थितीत करावे काय हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.
सध्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमधून पेरणीसाठी संकरीत भात बियाणे विक्र ी मोठ्या प्रमाणात चालू आहे. ह्या संकरित बियाणांवर त्यांना चांगला नफा मिळतो.मात्र खतांवर कमी नफा असल्यामुळे ही कृषि सेवा केंद्रे विक्र ीसाठी खते मागविण्यात टाळाटाळ करीत आहेत तसेच काही दुकानदार युरियाची विक्र ी सरळ काही रासायनिक कंपन्यांना करून जास्त नफा मिळवितात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून खत न मिळाल्याचा परिणाम शेतीच्या पुढील उत्पादनावर होतो.

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचा तपशील अजून प्राप्त व्हायचा आहे तो झाली की तिचा लाभ नेमका कोणाला व किती आणि कसा कधी मिळेल हे स्पष्ट होईल.
-श्रीकांत पाठारे,
मुख्य शेती कर्ज अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

ज्या शेतकऱ्यांनी आपले दागिने गहाण ठेवून बँकांची कर्जे फेडली आहेत त्यांना आणि विद्यमान कर्जदारांनाही ह्या माफीचा फायदा मिळायला हवा.
-महेंद्र अधिकारी,
शेतकरी, नागझरी

हा निर्णय शासनाने ह्या पूर्वीच घ्यायला हवा होता.जेणे करून शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली नसती. मात्र तरीही हा निर्णय स्वागतार्ह आहे.
-ब्रायन लोबो,
कष्टकरी संघटना.

ह्या निर्णयाचे स्वागत असले तरी भविष्यात पुढे आत्महत्येचे सत्र बंद व्हावे ह्यासाठी शेतमालाला १०० टक्के हमीभाव मिळायला हवा.
- संतोष पावडे,
शेतकरी संघर्ष समिती.

मी भाताची पेरणी करून ८ दिवस झाले आहेत. रोपांची वाढ होण्यासाठी मला युरियाची आवश्यकता आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून मी कृषि सेवा केंद्रांवर हेलपाटे मारतोय. मात्र कुठेही खत मिळत नाही. यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढून कृषी सेवा केंद्रांना खताची उपलब्धता करण्याचे आदेश द्यावेत.
-शिवाजी गोतारणे, शेतकरी, गातेस

कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना त्वरीत युरीया उपलब्ध करून द्यावे. नाही तर अशा कृषी सेवा केंद्रांची मान्यता रद्द करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.
-कांतीकुमार ठाकरे, अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका

युरियाची मागणी मे महिन्यात करण्यात आली आहे मात्र कंपनीकडून ते देण्यात आलेले नाही.
- आर. आर. जाधव ,
कृषी अधिकारी पंचायत समिती वाडा

Web Title: 103 crore of loan waiver in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.