बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत १२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
By नितीन पंडित | Published: June 24, 2023 03:20 PM2023-06-24T15:20:53+5:302023-06-24T15:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: शहरात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून परिमंडळ क्षेत्रातील गो तस्करी सोबतच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शहरात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून परिमंडळ क्षेत्रातील गो तस्करी सोबतच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या सराईत १२ गुन्हेगारांवर तडीपार करण्याची कारवाई केली असल्याची माहिती भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शनिवारी दिली आहे.
निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गो तस्करी मधील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख अनिस अबुबकर मोमीन उर्फ अनिस कटोरा व त्याचे साथीदार फैसल अन्वर हुसेन मिर्झा, अमरान निसार कुरेशी यांना १८ महिन्या साठी हद्दपार करण्यात आले आहे.टोळी प्रमुख अनिस कटोरा याच्यावर महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा १९७६ प्रमाणे प्राण्यांच्या कत्तली बाबत ५ गुन्हे दाखल आहेत.तर पशू संवर्धन कायद्याखाली तीन गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार एजाज उर्फ इजाज उर्फ इज्जु अब्दुल वाहीद कुरेशी याला सुध्दा १८ महिन्यांसाठी,मेहबुब जब्बार पटेल यास एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळीतील टोळी प्रमुख अदनान तरबेज खान व त्याचे साथीदार साहील मोहजम शेख,मोहम्मद असरार मोहम्मद सौदागर अंन्सारी, भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील अमली पदार्थ विक्रीतील कुविख्यात जेहरुनिस्सा उर्फ जबराईन अब्दुल जब्बार अन्सारी,व रोहन गजानन वानखेडे यांना प्रत्येकी सहा महिने व दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धार्मिक भावना दुखवून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार मोहम्मद जाहिद मोहम्मद जव्वाद अन्सारी यास २ वर्षासाठी तर नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील आकाश उर्फ चिकु सुरेश पवार यास एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. जुन २०२३ मध्ये मपोका ५५ प्रमाणे ६ व मपोका ५६ प्रमाणे ६ असे एकुण १२ सराईत गुन्हेगारांना भिवंडी पोलिस परिमंडळ क्षेत्रातून उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी हद्दपार केले आहे.पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गो तस्करी सह गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.