खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:13 AM2024-05-14T06:13:59+5:302024-05-14T06:14:50+5:30
गृहमंत्री अमित शाह यांची सभा सुरू असताना अचानक वादळामुळे सभेच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र नागरिकांनी त्यांचे भाषण पूर्ण ऐकले.
लोकमत न्यूज नेटवर्क, वसई/विरार : मागील खिचडी सरकारने १२ लाख कोटींचे घोटाळे केले; पण मोदींवर कुणीही घोटाळ्याचा आरोप करू शकणार नाही. मुंबईत हल्ले झाले, आपले मौनीबाबा काही करू शकले नाहीत. आपल्याकडे पुलवामा झाला. नरेंद्र मोदी सरकारने घरात घुसून उत्तर दिले. हे लोक पाकिस्तानला उत्तर देऊ शकतात का, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना विचारला.
वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मैदानात सोमवारी सायंकाळी शाह यांची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. राजेंद्र गावित, महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, माजी आमदार विलास तरे आदी उपस्थित होते.
शाह म्हणाले की, आपल्यासोबत आज खऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. हेमंत सावरा यांना खासदार बनवून विष्णू सावरा यांना श्रद्धांजली दिली जाईल. हेमंत सावरा यांना खासदार बनवले तर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. तुमचे एक मत तीन कामे पूर्ण करतील. ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आहे, असे सांगून राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात का, असा सवालही त्यांनी केला. लोकांना मोफत धान्य कोण देऊ शकते तर ते फक्त आणि फक्त मोदी देऊ शकतात, असेही ते म्हणाले.
सभेमध्ये धुळीचे साम्राज्य
गृहमंत्री अमित शाह यांची सभा सुरू असताना अचानक वादळामुळे सभेच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र नागरिकांनी त्यांचे भाषण पूर्ण ऐकले.