जिल्ह्याच्या विविध योजनांसाठी १२५ कोटी ९२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 01:56 AM2020-01-26T01:56:56+5:302020-01-26T01:57:09+5:30
सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी त्यांनी १२५ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
पालघर : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये राबवायच्या विविध योजनांसाठी १२५ कोटी ९२ लाख रुपये आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये राबवण्याच्या विविध योजना व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय यावर एक सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे व पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात केले. सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी त्यांनी १२५ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये ५ टक्के निधी म्हणजेच ६ कोटी २९ लाख ६० हजार रुपये नावीन्यपूर्ण व इतर योजनांसाठी तर उर्वरित ९५ टक्के निधीच्या दोन-तृतीयांश निधी म्हणजेच ७९ कोटी ७४ लाख ९३ हजार लाख गाभा क्षेत्रातील विविध योजनांसाठी तर एकतृतीयांश निधी म्हणजेच ३९ कोटी ८७ हजार ७४ हजारांचा निधी बिगरगाभा क्षेत्रातील योजनांसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
वाढीव निधीसह अंतिम आराखडा मंजूर -डॉ. शिंदे
कृषिमंत्री, माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी ग्रामीण विकास, परिवहन, शिक्षण, आरोग्य, नगरविकास, बंदरे विकास व पर्यटन इत्यादी विविध क्षेत्रासाठी १६९ कोटी २ लाख अतिरिक्त मागणी केली. मात्र महत्त्वाच्या योजनांसाठी ५६ कोटी ५८ लाख अतिरिक्त आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.
२४ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत ३१ कोटी ५८ लाख निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. यापैकी ७ कोटी ५० लाख विक्रमगड, जव्हार, वाडा येथील प्रशासकीय इमारतीकरता प्रत्येकी २ कोटी ५० लाखांची, तर पुढील वर्षाकरता ७ कोटी ५० लाख प्रशासकीय इमारतीकरता मिळतील.
जिल्ह्यासाठीची ही विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. अशा प्रकारे
३१ कोटी ५८ लाख निधीसह पालघर जिल्ह्याचा सन २०२०-२१ चा १५७ कोटी
५० लाख अंतिम आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.