अंकुश राज हत्या प्रकरणात ११ महिन्यांनी १२ वा आरोपी अटकेत
By धीरज परब | Published: December 11, 2023 07:41 PM2023-12-11T19:41:15+5:302023-12-11T19:41:35+5:30
फरार असलेल्या आरोपीला ११ महिन्या नंतर पकडण्यात मीरारोड पोलिसांना यश आले आहे.
मीरारोड - मीरारोडच्या जांगीड सर्कल ह्या गजबजलेल्या ठिकाणी अंकुश राज ह्या २० वर्षीय तरुणाची जानेवारी महिन्यात टोळक्याने हत्या केल्या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला ११ महिन्या नंतर पकडण्यात मीरारोड पोलिसांना यश आले आहे. ह्या गुन्ह्यात एकूण अटक आरोपींची संख्या १२ झाली असून आणखी दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मीरारोडच्या शिवार उद्यान जवळ क्वीन्स पार्क भागात राहणाऱ्या अंकुश चा नातलग हर्ष राज याचे व आयुष भानुप्रताप सिंग (२०) रा . काशीगाव यांच्यात मीरागाव येथील पेट्रॉप पंप वर पेट्रोल भरण्याच्या नंबर वरून भांडण झाले होते. नंतर हर्ष ने आयुषला कड्याने मारल्याने तेव्हा अंकुश तेथे होता. बदला घेण्यासाठी आयुषने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत एमटीएनल मार्ग व जांगीड सर्कल दरम्यान मीरा दर्शन इमारत येथील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजवर अंकुश गाठले. अंकुश याला बेदम मारहाण करून चाकू ने त्याची हत्या करण्यात आली . भर सायंकाळी एका टोळीने केलेल्या ह्या हत्याकांडा मुळे खळबळ उडाली . पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तातडीने आरोपीना पकडण्यासाठी मार्गदर्शन करत गुन्ह्याचा आढावा घेतला . त्यावेळी गुन्हे शाखा कक्ष १ , मीरारोड व काशीमीरा पोलिसांनी काही तासात आयुष सह त्याच्या ९ साथीदारांना अटक केली होती.
उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यकआयुक्त महेश तरडे व मीरारोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकराहुलकुमार पाटील , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक संतोष सांगवीकर व रामकृष्ण बोडके, उपनिरीक्षक किरण वंजारी सह प्रशांत महाले, प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, शंकर शेळके , अथर्व देवरे यांच्या पथकाने ९ डिसेम्बर रोजी हत्येच्या गुन्ह्यातील १२ वा आरोपी रोहितकुमार शंकर पासवान (२४ ) रा . म्हाडा बिल्डींग, माशाचा पाडा, काशीमीरा ह्याला घोडबंदर मार्गावरील चेणे पुला जवळून अटक केली. पासवान हा मूळचा बिहार असून तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचला होता . पासवान हा अंकुश याच्या हत्ये नंतर नालासोपारा भागात वास्तव्य करत होता. आणखी दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.