१५० वी गांधी जयंती : वारली चित्रशैलीत चितारला महात्मा गांधींचा जीवनपट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:58 PM2019-09-30T23:58:58+5:302019-10-01T00:00:23+5:30
१५० व्या गांधीजयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे १ ते ८ आॅक्टोबर या काळात चित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : १५० व्या गांधीजयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे १ ते ८ आॅक्टोबर या काळात चित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात डहाणूतील गंजाड गावाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकार अनिल वांगड यांचे महात्मा गांधीच्या जीवनपटावर आधारित वारली चित्रशैलीतील पेंटिंग लावले जाणार आहे.
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवनप्रवास वारली पेंटिगमधून उभा करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीतील दस्तकारी हार्ट समितीकडून अनिल वांगड यांना आला. परदेशातील प्रदर्शनात व्यस्त असल्याने कमी अवधीत हे चित्र पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. याकरिता बापूंच्या जीवनावर आधारित लिखित आणि फोटोद्वारे माहिती मिळविणे आवश्यक होते. त्याकरिता त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अशी माहिती गोळा केली. यासाठी गांधी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जाण्यापासून तेथील श्वेत-अश्वेत भेदाभेद, आगगाडीच्या डब्यात घडलेला अपमानास्पद प्रकार, त्यानंतर भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेली आंदोलने, ब्रिटिशांची दडपशाही, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, अहिंसा, सत्य व सर्वधर्म समभावाची शिकवण, चरख्यावर सूत कातण्यापासून दैनंदिन कार्य, भारत छोडो आंदोलन ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतच्या घटनांना चित्रात स्थान देण्यात आले आहे. हे चित्र ४० बाय ५४ इंच आकारातील असून ते साकारायला सात दिवसांचा अवधी लागला. त्याकामी त्यांच्या पत्नीचीही त्यांना मदत झाली. पूर्ण झालेले चित्र स्पीडपोस्टाने नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले.
१ ते ८ आॅक्टोबर या काळात नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर येथे हे पेंटिंग प्रदर्शनात लावण्यात येणार असल्याची माहिती वांगड यांनी ‘लोकमत’ला दिली. ते जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै.जिव्या सोमा म्हसे यांचे शिष्य आहेत.
नवी दिल्लीतील दस्तकारी हार्ट समितीतर्फे १५० व्या गांधी जयंतीनिमित्त हे वारली पेंटिंग काढण्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर इंटरनेटवरून तसेच शालेय पुस्तकातून माहिती व चित्राचा अभ्यास करून वारली चित्रशैलीत हे पेंटिंग पूर्ण केले. यामध्ये त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा समावेश आहे.
- अनिल वांगड,
वारली चित्रकार, गंजाड/डहाणू