वसई मंडलात दोन दिवसात 1600 वीज जोडण्याची तपासणी, 80 वीज चोरांविरुद्ध कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 11:18 PM2020-12-28T23:18:51+5:302020-12-28T23:19:32+5:30
वीज चोरट्यांविरुद्धची मोहीम नियमित सुरु राहणार असून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
वसई मंडल कार्यालयांतर्गत 55 अभियंता व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन दिवसात 1600 वीज जोडण्याची तपासणी करून 80 वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता राजेशसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली. वीज चोरट्यांविरुद्धची मोहीम नियमित सुरु राहणार असून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
अभियंते व कर्मचाऱ्यांच्या 55 जणांच्या विशेष पथकाने नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन, गौराई पाडा, वलई पाडा, मोरेगाव, हवाई पाडा, बिलालपाडा, यादव नगर, कारगिल, रहमान नगर, श्रीराम नगर आदी भागात विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत वीज चोरी आणि अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात केली. जवळपास 1600 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये एकूण 80 ठिकाणी वीज चोरी पकड्ण्यात आली. सुमारे एक लाख 60 युनिट विजेच्या चोरी प्रकरणी चोरीच्या विजेचे देयक आणि दंडाची रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली असून याला प्रतिसाद न देणाऱ्यांविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. तर अनधिकृत वीज वापर करणाऱ्या 16 ग्राहकांना तीन लाख 74 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तत्पूर्वी दि 1 ते 19 डिसेंबर दरम्यान संतोष भुवन, विजय नगर, तुळींज, नागिनदास पाडा, प्रगतीनगर, मोरेगाव, ओसवाल आदी भागात वीज चोरांविरुद्ध मोहिम राबवण्यात आली होती. यात 1100 वीजजोडण्या तपासण्यात आल्या. वीजचोरी आढळलेल्या 49 जणांना पाच लाख 72 हजारांचे वीजचोरीचे देयक व दंड आकारण्यात आला होता. यातील 16 जणांनी 3 लाख 21 हजार रुपयांचा भरणा केला असून इतरांविरुद्ध फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरु आहे.