१७ कोटींचे कर्ज होणार माफ
By admin | Published: June 15, 2017 02:36 AM2017-06-15T02:36:24+5:302017-06-15T02:36:24+5:30
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांतून ३१ मार्च २०१७ पर्यंत वितरित केलेल्या पीक कर्ज व कृषी मध्यम कर्ज अशा दोन्ही प्रवर्गातील एकूण ३ हजार ४६ अल्प,अत्यल्प व इतर शेतकऱ्यांचे
- निखिल मेस्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क
नंडोरे : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांतून ३१ मार्च २०१७ पर्यंत वितरित केलेल्या पीक कर्ज व कृषी मध्यम कर्ज अशा दोन्ही प्रवर्गातील एकूण ३ हजार ४६ अल्प,अत्यल्प व इतर शेतकऱ्यांचे सुमारे १७ कोटी ४७ लाख रुपयाचे कर्ज राज्यशासनाच्या निर्णयामुळे माफ होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
लोकमतने पालघर जिल्ह्यात बळीराजाचे कर्ज होणार माफ या मथळ्याखाली ठाणे जिल्हा बँकेच्या पीक कर्जदार शेतकऱ्यांची जिल्ह्यानिहाय कर्जमाफीची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील १ हजार ४ अल्प भूधारक शेतकऱ्यांना आजतागायत ५ कोटी ७५ लाख, ७५९ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख व २ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या १ हजार २८३ शेतकऱ्यांना ७ कोटी ३७ लाख असे सर्व प्रवर्ग मिळून एकूण ३ हजार ४६ भूधारक शेतकऱ्यांना १७ कोटी ४७ लाख इतके कर्जवाटप करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१७ पर्यंत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँक असे मिळून २१ हजार २२९ भूधारक शेतकऱ्यांना जिल्ह्यात १४१ कोटी २७ लाख इतके कर्ज वितरित केलेले आहे. तसेच ३१ मार्च ते आजतागायत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत सुमारे ३२ कोटी रु पयाचे कर्ज वाटप करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जमाफीत हे सर्व कर्ज सरसकट माफ होणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता प्रत्यक्षात हे कर्ज कधी माफ होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.