२ मुली अनाथ! विरारमध्ये महिलेची घरात हत्या; आरोपी प्रियकर शेखर कदमला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 06:34 AM2024-06-26T06:34:52+5:302024-06-26T06:34:55+5:30
विरारमध्ये महिलेची गळा दाबून हत्या; आरोपी प्रियकराला ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : विरारमध्ये ३२ वर्षीय विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. येथील प्रथमेशनगरमधील साईनाथ अपार्टमेंटमध्ये धनश्री आंबडस्कर (३२) ही महिला पती रुपेश आंबडस्कर (३७) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह राहत होती.
सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता. तसेच दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. दुपारी धनश्रीचा प्रियकर शेखर कदम तिला भेटायला घरी आला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने धनश्रीची गळा दाबून हत्या केली. काही वेळाने शेखरने शेजाऱ्यांना जमवून ती बेशुद्ध झाल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
चौकशीत कबुली पोलिसांनी चौकशी केली असता, दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हाच तिला भेटायला घरी आला होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, याने तिची हत्या का केली? त्यामागे नेमके काय कारण आहे? याचा विरार पोलिस तपास करीत आहेत.