शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 01:15 PM2022-08-14T13:15:01+5:302022-08-14T13:15:21+5:30
शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते.
- हितेन नाईक
पालघर : राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास आता शासन आपल्या मदतीसाठी धावणार आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसाहाय्य देण्यात येते.
शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते. सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरला असून, दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.
५० पैकी ७ प्रस्ताव मंजूर
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनंतर्गत २०२०-२१ मध्ये आठ तालुक्यांतील ५० प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले. त्यातील ७ प्रस्ताव मंजूर झाले. कंपनीकडे २९ प्रलंबित असून, दोन प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांमुळे रद्द झाले आहेत, तर त्रुटी प्रलंबित १२ प्रस्ताव पडून आहेत.
दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाख
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते
एक अवयव गेल्यास एक लाख
शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अथवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते
अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख
एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची नुकसानभरपाई देण्यात येते.
मदतीसाठी अर्ज कोठे कराल?
एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल, तसेच दावा अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील. अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल.
अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाने ४५ दिवसांच्या आत योग्य कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपला प्रस्ताव दाखल करावा.
- जिल्हा कृषी अधीक्षक, पालघर