वसई महापालिकेला स्वच्छतेचे २ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:03 AM2018-03-25T03:03:18+5:302018-03-25T03:03:18+5:30
केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला.
वसई : केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला.
केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाने दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिका हद्दीतील स्वच्छता राखण्यासाठी वस्ती स्तर संघ नेमण्यात आले होते. कचरा गोळा करणे. त्याचे व्यवस्थापन करणे. हगणदारी मुक्त परिसर करण्यासाठी प्रचार करणे. वैयक्तीक तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी व वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे. सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्याठिकाणी वृक्ष लागवड करणे. गांडूळ खत निर्मिती करणे, अशी कामे वस्तीस्तर संघांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये ज्यांनी स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केलेत अशा संघांना दिल्लीत विशेष कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रतील १० वस्तीस्तर संघांनी यात बाजी मारली. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या मदीना वस्तीस्तर संघ आणि आधार वस्तीस्तर संघाचा समावेश आहे. केंद्रीय शहरी व नागरी राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते उपायुक्त अजीज शेख आणि वस्तीस्तर संघातील महिला सदस्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय सचिव दुर्गा शंकर, महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाचे संचालक डॉ. वीरेंद्र कुमार सिंग यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.