मीरा भाईंदर मध्ये संगीत विद्यालयसाठी २० कोटीच्या कामास मंजुरी
By धीरज परब | Published: April 18, 2023 08:02 PM2023-04-18T20:02:37+5:302023-04-18T20:02:44+5:30
पुढील महिन्यात या कामाचे भूमिपूजन केले जाईल .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आरक्षण क्रमांक २४६ मध्ये संगीत विद्यालय बांधण्या करीता राज्य शासनाने मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजने अंतर्गत २० कोटी रुपयांच्या कामास तत्वतः मंजूरी दिली आहे.
या बाबत माहिती देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मीरा भाईंदर मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे त्यांच्या संगीत विद्यालय उभारण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती . मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशा नुसार नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी काढलेल्या १३ एप्रिलच्या शासन निर्णया नुसार २० कोटींच्या कामास तत्वतः मंजुरी दिली आहे . सदर निधी टप्या टप्याने वितरित केला जाणार आहे .
पुढील महिन्यात या कामाचे भूमिपूजन केले जाईल . हे संगीत विद्यालय राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न राहणार आहे . शहरातील कलावंत तसेच अनेक नवोदित कलावंतांना ह्या संगीत विद्यालय ( गुरुकुल ) चा फायदा होणार आहे . संगीत विद्यालयात शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम चालवला जाणार असल्याने गायक कलावंत येथून अधिकृत पदवी घेऊ शकतील असे आ . सरनाईक म्हणाले .