होळीसाठी वसईतून कोकणात जाणार २० एसटी; एका बसमध्ये फक्त ३० प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:50 PM2021-03-22T23:50:27+5:302021-03-22T23:50:51+5:30
गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच बस सोडणार
सुनील घरत
पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून त्याचे सावट होळी सणावरही आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असेल असा अंदाज घेत एसटी महामंडळाकडून वसई-विरारमधून होळीसाठी कोकणात २० बसेसच सोडल्या जाणार आहेत. त्यातही प्रत्येक बसमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून केवळ ३० प्रवासीच राहणार आहेत.
यंदा कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता शिमगोत्सव उत्साहात होणाऱ्या कोकणातीलही अनेक गावांत यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे आणि कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी धोका टाळण्यासाठी सार्वजनिकपेक्षा खासगी वाहनांचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. तरीही सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून कोकणाकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधून कोल्हापूर, खेड, महाबळेश्वर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण या गाड्या २७ मार्चला १० वाजता व २८ मार्चला १० वाजता सोडण्यात येणार असून, २ मार्च व ३ मार्चला या बस परतीचा प्रवास करणार आहेत. अर्नाळा, नालासोपारा, वसई आगारातून या गाड्या धावणार असून, प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत.
गेल्या वर्षी शिमगोत्सवानिमित्त वसई - विरारमधून २३ ते २४ बस कोकणाकडे धावल्या होत्या, मात्र यंदा कोरोनामुळे ही संख्या थोडी कमी केली आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी हा रिपोर्ट करावा लागणार आहे.
कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. तसेच गाडीत प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून, मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - राजेंद्र जगताप, नियंत्रक, एसटी पालघर विभाग.