पालघरात २२ हजार किलो डाळी जप्त
By admin | Published: October 23, 2015 12:10 AM2015-10-23T00:10:53+5:302015-10-23T00:10:53+5:30
पालघरमधील विमल माणिकलाल जैन (४१) या व्यापाऱ्याकडे जीवनावश्यक वस्तू साठविण्याचा कुठलाही परवाना नसताना त्यांनी गोदामात बेकायदेशीररीत्या तूरडाळ
पालघर : पालघरमधील विमल माणिकलाल जैन (४१) या व्यापाऱ्याकडे जीवनावश्यक वस्तू साठविण्याचा कुठलाही परवाना नसताना त्यांनी गोदामात बेकायदेशीररीत्या तूरडाळ, मसूर इ. २२ हजार ७०० किलो (२२७ क्लिंटल) ची साठवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात तूरडाळीसह अन्य अन्नधान्यांची व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्रिम साठवणूक केल्याने तूरडाळीसह इतर कडधान्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ही कृत्रिम भाववाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालघर-मनोर रोडवरील मेसर्स कांतिलाल माणिकलाल अॅण्ड कंपनीचे मालक विमल जैन यांनी त्यांच्या दुकानात बेकायदेशीररीत्या अन्नधान्यांची साठवणूक केल्याची माहिती जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी, तहसीलदार चंद्रसेन पवार आणि पुरवठा अधिकारी संभाजी
पावरा यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानामागील गोदामात धाड टाकली.
त्यांच्या गोदामात ५२.८५ क्विंटल तूरडाळ, ४३.५० क्विंटल मूगडाळ, ४१५.४५ क्विंटल तांदूळ, ४.८० क्विंटल उडीदडाळ, ८.४० क्विंटल मसूरडाळ, ४.२० क्विंटल चवळी, २.१० क्विंटल मठ, २५.२० क्विंटल चणे, १२.५० क्विंटल वाल, २०.७० क्विंटल चणाडाळ असे २२ हजार ७०० किलो (२२७ क्विंटल) असा ३६ लाख २९ हजार ४७५ रु.चा माल सापडला.
या जीवनावश्यक वस्तू बेकायदेशीररीत्या साठवल्याचे तसेच त्यासंबंधित कुठलाही परवाना दुकानमालकाकडे नसल्याचे पुरवठा अधिकारी पावरा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याविरोधात जीवनावश्यक अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून गोदाम सील करण्यात आले आहे. (वार्ताहर)
जीवनावश्यक वस्तूंची साठमारी करून कृत्रिम भाववाढ करीत सर्वसामान्य ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली असून धडक कारवाई करण्यात येणार आहे.
- चंद्रसेन पवार, तहसीलदार, पालघर