‘त्या’ शिक्षिकेवर २४ वर्षे अन्याय; न्याय मिळूनही होते ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:27 AM2019-01-13T00:27:25+5:302019-01-13T00:27:28+5:30
सेवाज्येष्ठता यादी तयार करताना या जेष्ठ शिक्षिकेला जाणूनबूजून डावलले गेले.
वसई : शिक्षकांना न्यायालयाची पायरी चढल्यावर तेथे न्याय मिळाल्यावरही शिक्षण संस्थेकडून न्यायालयीन आदेश पायदळी तुडवले गेले आहेत. आगाशी-विरार -अर्नाळा शिक्षण संस्थे मधील शिक्षीका कविता सावे यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, थोडी थोडकी नव्हे तर तब्बल चोवीस वर्षे त्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. पाच वेळा न्यायलयाचे दार ठोठावून, तीन वेळा न्याय मिळवून त्या आजही संस्थेच्या आडमुठेपणामुळे न्यायालयात एकाकी लढत देत आहेत.
आगाशी-विरार -अर्नाळा शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार या प्रकरणामुळे समोर आला आहे. गेले अडिच तप संस्थेकडून त्यांना अमानुष प्रकारची वागणूक देऊन त्यांचे मानिसक खच्चीकरण केले जात असल्याची त्यांची तक्रार आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपली बाजू मांडली. न्यायालयानेही त्यांच्या बाजूने आता पर्यंत तीन वेळा निकाल दिला आहे. मात्र, शिक्षण संस्था त्या आदेशांची योग्य प्रकारे अंमल बजावणी करत नसल्याचे समोर आले आहे. न्यायालयाची अवमान याचिका कॉमटेनम्ट आॅफ कोर्ट दाखल असताना अजून दोन केस शासनावर या संस्थेने दाखल करून सावे यांचा निकालही लांबणीवर टाकला आहे.
सेवाज्येष्ठता यादी तयार करताना या जेष्ठ शिक्षिकेला जाणूनबूजून डावलले गेले. या प्रकारात शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचे सावे यांचे म्हणणे आहे. संस्थेचे रोस्टर (बिंदूनामावली) शासकीय नियमा प्रमाणे प्रमाणित नाही. त्यात फेरफार केलेले आहेत.
रिक्त जागेवर स्वत:चे नातेवाईक, हितसंबंधी यांना नियम बाह्य नेमणूका देऊन मोठा आर्थिक स्वरूपाचा गैर व्यवहार संस्थाचालकांसोबत इतर पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून केला असल्याचेही माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.
शिक्षक भरतीत आणि पदोन्नती मध्ये बोगस गिरी करत, यात मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्यामुळे न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही संस्था चालक व शासनाच्या अधिकाºयांनी शिक्षिका सावे यांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे त्यांची वेतन निश्चिती चुकीची केली गेली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संस्था चालकांच्या मेहेरबानीने पदोन्नत झालेले हे शिक्षक त्यांच्या पदाचा शासकीय नियमानुसार होणारा कार्यभार पूर्ण करत नाहीत, असेही समोर आले आहे.
याबाबत आता शिक्षिका सावे यांनी राज्य माहिती आयोग व शासना पर्यंत या गैर व्यवहाराची दाद मागितली आहे. संस्थेने वेळोवेळी अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याचे कविता सावे यांनी राज्य माहिती आयोग पुढे दिली आहे. तब्बल पाच वेळा कोर्टात केस लढायला लावूनही शाळेत काम करण्यास त्यांना असह्य केले आहे. शासन दरबारी व उच्च न्यायालयात त्या गेली २४ वर्षे त्या लढा देत आहेत.
संस्थेने कोर्टाची अवहेलना केलेली नाही.हा विषय न्यायप्रविष्ट आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सदर शिक्षीका रजेवर आहेत.त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रही त्यांनी सादर केलेले नाही. त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
- नारायण म्हात्रे, सेक्र ेटरी, आगाशी- विरार - अर्नाळा शिक्षण संस्था.
सदर संस्थाचालकांनी कोर्टाची अवहेलना केलेली आहे. संस्थाचालकांच्या मानिसक दबावाखाली राहून मला ज्ञानार्जनाचे पवित्र कार्यही करून दिले जात नाही. माझी पदोन्नतीही डावलली गेली आहे.
- कविता मिलिंद सावे, शिक्षिका