रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

By admin | Published: January 11, 2017 06:09 AM2017-01-11T06:09:11+5:302017-01-11T06:09:11+5:30

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले.

244 victims of a railway accident in the year | रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

Next

विरार : वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले. यामध्ये ३० महिला आणि ८० बेवारसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटते आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड भार्इंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे, गाडीत चढत असताना निसटून पडणे, टपावरून प्रवास करतांना शॉक लागणे, गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करतांना पोलला धडकून पडणे या सारख्या घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असतो. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडले आहेत.
मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्टेशनच्या ३५ कि.मी.च्या अंतरात २०१४ या सालात ३०५ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये १७६ पुरूष आणि २६ स्त्रीयांची ओळख पटली होती.
उर्वरित ९१ पुरूष आणि १२ स्त्रीयांची ओळखच पटली नसल्याने बेवारस मृतांचा आकडा १०३ होता. २०१५ या सालामध्ये एकूण २६४ जणांचे बळी गेले. त्यात मीरारोड येथे २०, भाईंदरमध्ये ४३ , नायगावमध्ये ११, वसईत ५५, नालासोपारा येथे -५७, विरारमध्ये -७३ आणि वैतरणा परिसरातील चार जणांचा समावेश आहे. ७३ जणांची ओळख पटली नव्हती.
जानेवारी-डिसेंबर २०१६ मध्ये मीरारोड-२५,भाईंदर-३७, नायगाव-१४, वसई-३८,नालासोपारा-४४, विरार-८१, वैतरणा-५ असे मिळून २४४ जण मृत्यूमुखी पडले होते. मृतांमध्ये ३० महिलांचा समावेश होता. मृतांपैकी १६४ जणांची ओळख पटली होती. तर ८० बेवारस होते.

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून रेल्वे अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येते. २०१४ मध्ये ३०५ मृत्यूमुखी पडले होते. २०१५ मध्ये त्यात घट झाली होती. २०१५ वर्षी मृतांची संख्या २६४ होती. तर गेल्या वर्षी २४४ जणांचा मृत्यू झाला होता. वैतरणा ते मीरा रोड दरम्यान प्रत्येक स्टेशनवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने स्टेशन परिसरात भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांचे रस्ते बंद होऊ लागले आहेत. तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी अपघातात घट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रवास करताना स्वत:ची काळजी घेतल्यास अपघाती मृत्युंपासून बचाव होऊ शकतो. प्रवाशांनी जीन्यांचा वापर करून सुविधांचा वापर केला पाहिजे. जलद प्रवासाच्या नादात प्रवाशी आपला जीव गमावत आहेत. यासाठी प्रवासी संघटनांनी जनजागृती मोहिम हाती घेतली पाहिजे.
- महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Web Title: 244 victims of a railway accident in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.