माटगावमध्ये २५ गायींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:26 AM2019-11-28T00:26:43+5:302019-11-28T00:27:04+5:30
वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.
डहाणू : वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. या मोकाट गायी असल्याने त्यांना कोणी मालक नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा, हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे.
माटगावच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती आहेत. त्यात भाजीपाला किंवा अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या सुमारास साठ ते सत्तर मोकाट गार्इंचा तांडा, कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि बाग फस्त करून टाकतात. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. याला कंटाळून हे बागायतदार एखाद्या वांग्यात अथवा भाजीपाल्यात थायमेट सारखे जहाल कीटकनाशक भरून, बागेच्या बाहेर लांबवर फेकून देतात. ती खाऊन गुरे मरतात. गायींच्या मृत्यूची ही एक शक्यता आहे. तर काही बागायतदार भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारणी करतात. हा भाजीपाला गुरांनी खाल्यानंतर गुरे मृत होतात, ही दुसरी शक्यता आहे.
याबाबत वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार आवटे यांनी शोधकार्य सुरू केले आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच मृत गार्इंच्या विल्हेवाटीसाठी खड्डे खोदण्याकरता, जेसीबी मशीनही मागविण्यात आली आहे. याबाबत नेमके काय घडले असावे, याची माहिती हा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होणार आहे.