सायबर शाखेने मिळवून दिले २६ नागरिकांचे मोबाईल
By धीरज परब | Published: October 7, 2023 07:03 PM2023-10-07T19:03:52+5:302023-10-07T19:04:28+5:30
पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात.
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेने २६ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत. ह्या २६ मोबाईलची किंमत ४ लाख २० हजार असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात. तसेच ऑनलाईन सीईआयआर पोर्टलवर प्राप्त तक्रारींचे देखील सायबर गुन्हे कक्ष यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे यांनी दिले आहेत.
सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर सह संतोष चव्हाण, माधुरी धिंडे, गणेश इलग, आमीना पठान, पल्लवी निकम, सुवर्णा माळी, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, प्रविण सावंत, राजेश भरकडे, विजय खोत, आकाश बोरसे, सोनाली मोरे यांच्या पथकाने नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल बाबत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास, विश्लेषण व पाठपुरावा करून २६ नागरिकांचे मोबाईल परत मिळवले.
सहायक पोलीस आयुक्त भास्कर पुकळे यांच्यासह सायबर शाखेच्या पथकाच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी सायबर शाखेने नागरिकांना सायबर गुन्हे विषयक माहिती व मार्गदर्शन केले.