पालघर मंडळात कृषीपंपांचे ३ कोटी थकीत, ‘कृषी संजीवनी’ची होणार अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:26 AM2017-11-03T06:26:57+5:302017-11-03T06:27:21+5:30
कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही.
कल्याण : कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही. त्यापैकी पालघर मंडळात ८२३९ पंपधारकांकडे सर्वाधिक म्हणजे ३.३९ कोटींची थकबाकी आहे. ही माहिती महावितरणने दिली आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकी कृषी ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाच समान हप्त्यांत वीजबिलाची थकबाकी भरण्याची संधी आहे. मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड माफ केला जाणार आहे. एप्रिल ते जून २०१७ चे वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येईल. मार्च २०१७ अखेरीस असलेली थकबाकी मूळ रक्कम पाच त्रैमासिक हप्त्यांत भरता येईल. वेळेवर हप्ते दिल्यास व्याज व दंड माफ केला जाणार आहे. हप्ते वेळेवर न भरल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. कल्याण परिमंडळात कल्याण, दिवा, मुंब्रा, कळवा, वसई, विरार, शहापूर, पालघर, अलिबाग, पेण, पनवेल, मुरबाड इतका मोठा परिसर येतो. कल्याण परिमंडळातील ३८ हजार ८५५ शेतकºयांना कृषीपंपासाठी जोडणी देण्यात आली होती. इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले आहे.
पालघर मंडळात ८२३९ थकबाकीदार
पालघर मंडळात एकूण १३ हजार ९४ कृषीपंपग्राहक आहेत. त्यापैकी आठ हजार २३९ ग्राहकांकडे ३ कोटी ३९ लाख रु पयांची थकबाकी आहे.
वसई मंडळात ५ हजार ८३ कृषीपंपग्राहक असून त्यापैकी ३ हजार २२ ग्राहकांकडे एक कोटी ४४ लाख रु पयांची थकबाकी आहे.
कल्याण मंडळ-२ अंतर्गत एकूण ४ हजार ३४१ ग्राहक असून त्यापैकी दोन हजार ७७७ ग्राहकांकडे एक कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण मंडळ-१ अंतर्गत ५२ ग्राहक असून त्यापैकी ३७ ग्राहक हे थकबाकीदार
आहेत.