३०५४ गुन्हेगार एलसीबीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:16 AM2019-04-12T02:16:55+5:302019-04-12T02:16:57+5:30
निवडणुकीची पार्श्वभूमी : जिल्ह्यातील २३ पोलीस ठाणे अॅलर्टवर
नालासोपारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले फरार आणि वाँटेड आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून, फरार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची मोठी यादी तयार करून त्यांना पकडण्यासाठी पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कंबर कसली आहे. अशा ३०५४ आरोपींची यादी एलसीबीने तयार केली आहे. या टीमने बुधवारी ८ आरोपी पकडून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मारामारी, हुंडाबळी, हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, चोरी, दरोडा, अपघात असे अनेक गुन्हे दाखल करतात पण त्या त्या गुन्ह्यामधील आरोपींना पकडत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे आरोपी मोकाट आहेत. गुन्हे दाखल झालेल्या आरोपीसोबत पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांना ते जाणीवपूर्वक अटक करत नसल्याची चर्चा असते. आता यावर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी एक टीम बनवून फरार आणि पाहिजे या प्रकारातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्यात २०१६ साली हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सासू, सासरा, पती आणि नणंद तेव्हापासून फरार होते त्यांना बुधवारी या टीमने पकडून माणिकपूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे तर, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१८ साली दाखल झालेल्या मारामारी प्रकरणातील ४ अल्पवयीन आरोपी गेल्या काही महिन्यांपासून फरार होते त्यांना बुधवारी विरार पूर्वेकडील साईनाथ नाका येथून पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१५ साली हत्येचा प्रयत्न हा गुन्हा आरोपी दिलीप वासू पवार (४२) याच्या विरोधात दाखल केला होता पण तो तेव्हापासून फरार होता. बुधवारी संध्याकाळी आचोळे डोंगरी विभागातून त्याला अटक करून तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
३८ तडीपारांवरही डोळा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या जिल्ह्यातील तसेच शहरातील ३८ आरोपींना त्यांच्या जिल्ह्यातून, शहरातून तसेच पालघर जिल्ह्यामधूनही तडीपार केलेले आहे. ते आरोपी पालघर जिल्ह्यात कुठे वास्तव्यास किंवा लपून बसले आहेत का यांचाही शोध सुरू असून त्यांच्यावरही एलसीबीची करडी नजर असणार आहे.
पोलीस ठाण्यामधून गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणी फरार व पाहिजे आरोपींची यादी पाठवली जाते परंतु त्यामधील काही आरोपी शिक्षा भोगून जामीन, अटकपूर्व जामीन मिळवला आहे त्यांचीही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिटला पाठविणे गरजेचे आहे.
- जितेंद्र वनकोटी,
पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर