बर्ड फ्लूमुळे शहापूर, वसई-विरारमध्ये मारल्या ३१ हजार कोंबड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:53 AM2022-02-21T05:53:10+5:302022-02-21T05:57:37+5:30
आता १० किमी अंतरातील नमुने घेणार
भातसानगर/नालासोपारा : बर्डफ्लूमुळे शहापूर आणि वसई-विरारमध्ये तीन दिवसांत ३१ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममध्ये देशी कोंबड्या व बदके बर्ड फ्लूने मृत झाली हाेती. त्यानंतर एक किलोमीटर अंतराच्या परिघातील पोल्ट्री फार्ममधील २३ हजार ८१७ कोंबड्या तीन दिवसांत नष्ट करण्यात आल्या. यात ४५० गावठी काेंबड्यांचाही समावेश आहे. अर्नाळ्यातही शुक्रवार आणि शनिवारी पाच विशेष पथकांनी सर्च ऑपरेशनद्वारे ७ हजार कोंबड्या मारल्या आहेत. शहापूर येथे आता बाधित क्षेत्रापासून १० किमीच्या अंतरावरील गावांमध्ये जाऊन कोंबड्यांचे नमुने घेऊन ते परीक्षणासाठी पाठविण्याचे काम हाती घेतल्याचे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांनी सांगितले.
वेहलोळी येथील भारती वेखंडे यांच्या ४ हजार ५०, अनिल भोईर यांच्या तीन हजार, रवींद्र भोईर ४ हजार, छगन भोईर यांच्या ४ हजार, नरेश पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. तीन दिवसांच्या मोहिमेत गणेश भोईर, ललित भोईर, तात्या भोईर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या गावठी कोंबड्या नष्ट केल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजित हिरवे व डॉ. जी. जी. चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहायक आयुक्त डॉ. अमोल सरोदे, शहापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांच्यासह ७० जणांच्या पथकाने मुक्तजीवन सोसायटीमध्ये तीन दिवस मोहीम राबवली.
अर्नाळ्यामध्ये दोन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या जागेत आणि पुरापाडा येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागेत जेसीबीच्या साह्याने खड्डा करून कोंबड्या पुरण्यात आल्या. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी १८ फेब्रुवारीला आदेश काढून बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.
अर्नाळ्याच्या दासपाडा परिसरातील बॅरी बरबोज यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत होत असल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने पुणे वेधशाळेत पाठवले. त्यांनी साथीच्या तापाने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. यानंतर भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असता बर्ड फ्लूमूळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या नंतर पाच पथकांनी बर्ड फ्लूची लागण झालेल्या पोल्ट्रीतील १२०० ते १३०० कोंबड्या त्यांच्याच जागेत पुरल्या. नंतर एक किलोमीटर परिसरातील घरी पाळलेल्या २०० कोंबड्यांची डम्पिंग ग्राउंडवर खड्डा खणून विल्हेवाट लावल्याचे अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज संख्ये यांनी सांगितले. शनिवारी आलेल्या पथकाने डॉ. बाटलीकर यांच्या जागेत त्यांच्या पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार कोंबड्या पुरल्याचेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी, शनिवारी ७ हजार कोंबड्या खड्डा करून पुरण्यात आल्या. रविवारीही शोधमोहीम घेण्यात आली. घरी पाळलेल्या कोंबड्या दिवसा बाहेर जात असल्याने संध्याकाळी ही मोहीम राबविण्यात आली.
- पंकज संख्ये, ग्रामसेवक, अर्नाळा ग्रामपंचायत