वसई-विरारला कोरोनासह क्षयबाधेचाही घट्ट विळखा, दोन महिन्यांत ३३५ क्षयरुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:24 AM2021-04-01T02:24:19+5:302021-04-01T02:25:14+5:30
क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
- प्रतीक ठाकूर
विरार : क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोनासोबतच दोन महिन्यांत तब्बल ३३५ क्षयरोगाचे रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. ऐन कोरोना महामारीच्या काळात क्षयरोगानेही डोके बाहेर काढले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भावाशी लढण्यात व्यस्त असताना क्षयरोग रुग्णांची त्यात हेळसांड होत असल्याचे दिसून येते.
महापालिकेनेच दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षात २०२० मध्ये क्षयरोगाचे एकूण तीन हजार २५१ रुग्ण आढळून आले होते. त्यात १३७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत म्हणजेच एकूण ६० दिवसांत क्षयरोगाचे तब्बल ३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात असलेल्या झोपडपट्ट्यांत तसेच स्थलांतरित होऊन आलेले नागरिक यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची तजवीज आहे.
सध्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत क्षयरोगाचे प्रमाण वाढत असताना मंजूर करण्यात आलेली आठ थुंकी तपासणी केंद्रे सुरूच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. पालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ नसल्याने पालिकेने दोन खासगी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. विरार व वालीव अशा दोन केंद्रांत या डॉक्टरांची महापालिकेकडून वर्णी लावण्यात आली आहे.
क्षयरोगाच्या उपचारासाठी महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या सुविधा मर्यादित असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. क्षयरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून महापालिकेने पाच युनिट तयार केले असून त्यात पाच निरीक्षक नेमले आहेत. तसेच केवळ २५ ते ३० कर्मचाऱ्यांवर शहरांचा भार सोपवण्यात आला आहे. पालिकेच्या तुळिंज व वालीव येथील केंद्रांत क्षयरोग निदानासाठी व्यवस्था करण्यात आली असली, तरी तुळिंज येथील केंद्रातील मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार
याआधी ओपीडींद्वारे होत असलेली क्षयरुग्णांची तपासणी कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापासून बंद आहे. क्षयरोग हा टीबीचा प्रकार असून त्यात मल्टीट्रग रेझिस्टंट क्षयरोग हा अतिशय धोकादायक ठरू शकतो. वसई-विरार महानगरपालिकेकडून क्षयरोगाचे निदान होण्यासाठी एकूण २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत.
मात्र सद्य:स्थितीत केवळ १३ तपासणी केंद्रे सुरू असल्याचे समजते. रुग्णांना थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेच्या केंद्रांत असलेल्या थुंकी तपासणीच्या अहवालासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे.