दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:16 PM2023-10-08T15:16:10+5:302023-10-08T15:17:27+5:30
यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पालघर : वडराई-शिरगाव रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या केंद्राच्या जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
वडराईतील नवोदय विद्यालयात दि. ३० सप्टेंबर रोजी अकरावीतील सहा-सात विद्यार्थ्यांनी रात्री ११ वाजता विद्यालयातील उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत म्हणून बोलावण्यात आले. उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना उभे करून त्यांच्या कानावर विद्यार्थ्यांचा गुप्तांगावर मारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कानावर मारले ७-८ ठोसे
- एका विद्यार्थ्यांचा कान जास्त दुखू लागल्याने विद्यालयातील परिचारिकेकडे नेले असता, कानाला झालेली दुखापत बघून मुलांच्या आई-वडिलांना बोलावून घ्या व डॉक्टरांकडे त्याची तपासणी करा, असे सांगण्यात आले.
- यावेळी विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाल्याने हा प्रकार मारहाणीतून झाला आहे का? प्रश्न डॉक्टरांनी उपस्थित केला असता, हा प्रकार उघड होत पालकांना कळले. निखिल सिंग यांच्या कानावर सात ते आठ वेळा मारण्यात आले असून, त्याचा कानाचा पडदा फाटण्याची भीती व्यक्त केली आहे. औषधोपचार सुरू असून, जर सुधारणा झाली नाही तर सध्यातरी यावर शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे त्याचे पालक नेपाल सिंग यांनी सांगितले.
नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण
विशाल कुशवाह व सुशांत सोनकर या विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आले. यात विशालचा कान सुजला होता. तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाल्यास दोषी विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
- जॉन इब्राहम, प्राचार्य, जवाहर जवाहर नवोदय विद्यालय, पालघर