३५ गावे मतदानावर टाकणार बहिष्कार; वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:34 AM2020-10-13T01:34:29+5:302020-10-13T01:34:47+5:30
कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे
नालासोपारा : आगामी निवडणुकीनंतरच महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ३५ गावांतील मतदारांकडून पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत जनप्रबोधनासाठी बैठकाही होणार आहेत.
वसई-विरार महापालिकेतून ३५ गावे वगळण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्यात उपोषण, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, लोकप्रतिनिधींवर हल्ला, चुल बंद, गांव बंद अशी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनातून प्रस्थापितांचा निवडणुकीत पराभवही झाला होता. तर गावे वगळण्यासाठी न्यायालयीन लढाही सुरू होता. तरीही पालिकेतून गावे वगळण्यात आली नाहीत. आजही आगाशी, कोफराड, बापाणे, ससुनवघर, भुईगांव, गास, गिरीज, कौलार, मर्देस, नवाळे, निर्मळ, नाळे, वाघोली, दहिसर, राजोडी, उमराळे, वटार, चांदीप, कशिदकोपर, कसराळी, कोशिंबे, चिंचोटी, देवदळ, कामण, कणेर, कोल्ही, मांडवी, शिरसाड, चोबारे, किरवली, मुळगांव, सालोली आणि वडवली ही गावे पालिकेतून मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यास हरकत घेऊन महापौर राजीव पाटील यांनी गावे वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली होती. याच मुद्यावर गावे वगळण्याचा निर्णय अडकून पडला आहे. गेल्या आठवड्यात २९ गावे पालिकेतून वगळण्याचा विचार राज्य सरकारने न्यायालयात सादर केला. मात्र, वगळलेल्या गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत की नगरपरिषद स्थापन करायची याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागेल, असे सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पुढील तीन महिन्यात गावे वगळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून अनेक संघटना त्यात सहभागी होणार आहेत.
महापालिकेतून गावे वगळण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे, हा निर्णय कटू असला तरी गावांच्या अस्तित्वासाठी तो घ्यावाच लागणार आहे. तशी चाचपणी सुरू असून, ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहेत. - मिलिंद खानोलकर, संस्थापक अध्यक्ष, मी वसईकर अभियान