३६० आदिवासी कुटुंबांना मिळाली दिवाळी भेट
By admin | Published: November 7, 2015 10:21 PM2015-11-07T22:21:15+5:302015-11-07T22:21:15+5:30
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!
विक्रमगड : जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!
या संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीला साध्य करत युवा हितकारिणी संघ, भारतीय युवा शक्ती मुंबई (कुर्ला) व समृद्ध जीवन सामाजिक संस्था कुंर्झे यांच्या विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथील शांतीरतन विद्यामंदिर विद्यालयातील ५४० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व परिसरातील ३६० आदिवासी कुटुंबांना या वेळी दिवाळी भेट देण्यात आली.
तालुक्यातील कोंडगाव येथील शांतीरतन विद्यामंदिर विद्यालयात १००० हून अधिक आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी मोजक्याच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असल्याचे दिसून आले. त्यावर तालुक्यातील समृद्ध जीवन सामाजिक संस्थेने ही गंभीर बाब ध्यानी घेऊन त्यांनी अवघ्या सहा दिवसांत २५०० पाठ्यपुस्तके उपलब्ध करून त्यांचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांना हा दिवस अगदी आनंदाचा व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा मोलाचा ठरला.
या वेळी कोंडगाव, करसूड व विलशेत या गावांमधील ३६० गरजू व आदिवासी कुटुंबांना दिवाळी भेट म्हणून साखर, चणाडाळ, ब्लँकेट, कपडे व इतर अशा २१ जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच सर्वांना भोजन देऊन भजने व आदिवासी गाणी गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर, या वेळी या शाळेतील अधीक्षक पष्टे सर, कोम सर व आतकरी सर यांनी या भक्तांचे विशेष आभार मानले. या दोनही कार्यक्रमांमुळे परीसरातील आदीवासी बांधवात समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)