पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील चार कोटी ३५ लाख पाण्यात; कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:00 AM2021-01-30T01:00:38+5:302021-01-30T01:00:54+5:30
नागरिकांची वाट बिकटच, कोंढले-खैरे या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गजानन कन्स्ट्रशन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते.
वाडा : तालुक्यातील कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सन २०१८ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून प्रशासनाने ४ कोटी ३५ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करून हा संपूर्ण रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. परंतु, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने मे मध्ये बनविलेला रस्ता त्याच वर्षी जूनमध्ये उखडला गेल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. सध्या या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची वाट मात्र बिकटच झाली आहे.
कोंढले-खैरे या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गजानन कन्स्ट्रशन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने या कामाचा ठेका वाड्यातील सब-ठेकेदारांना दिले. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी केल्या; परंतु ग्रामस्थांच्या तक्रारी केराच्या टोपलीत पडल्याने या सब-ठेकेदाराने हे पूर्णपणे काम दर्जाहीन केल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाच वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ठेकेदार कंपनीने करायची होती; परंतु केवळ थातूरमातूर काम करून ठेकेदारांनी या रस्त्याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वारंवार या रस्त्यावर देखरेख करणाऱ्या शाखा अभियंत्याच्या निदर्शनास आणून दिले होते; परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी व ठेकेदारच जबाबदार असतील.- अल्पेश पांडव, ग्रामस्थ, खैरे
या रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी करण्यात आले. रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. अद्याप देखभाल व दुरुस्तीसाठी एक वर्ष शिल्लक असून, संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात येईल.- विनोद घोलप, शाखा अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पालघर