‘एक गाव एक गणपती’ची ४८ वर्षांची परंपरा कायम; उर्सेगावचा जनतेसमोर आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:07 AM2020-08-29T00:07:58+5:302020-08-29T00:08:16+5:30
शासनाच्या कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या उर्से गावाने ‘एक गाव एक गणपती’ उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.
गेल्या ४८ वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाच्या महिला, पुरुष व मुले एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोस्तव आणि सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सव आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४८ वे वर्ष असून या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजारच्या आसपास आहे.
दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श या गावाने जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसवला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करते. गणपती उत्सवात गावातील तरुणवर्ग एकत्र येऊन टाकाऊ वस्तूतून सजावट तयार करतात. यंदा इको फ्रेंडली मखर बनवण्यात आला. तर सजावटीमर्ध्ये साधेपणाने आकाश तारांगण तयार करून जात्यावर दळण दळणारी महिला मास्क बांधून गणेशमूर्तीच्या बाजूला आपले काम करीत आहे व कोरोनाविरोधात संदेश देताना दाखविण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असूनही कोणत्याही प्रकारची वर्गणी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व खर्च गावकरीच गोळा करतात. या गावाने कार्यक्रमासाठी आपले स्वत:चे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे.
गावाचे सर्व ग्रामस्थ याच सभागृहात आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर सर्व कामेही श्रमदानातून केली जातात. या गावाची परंपरा अशी की, गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. देवावरील श्रद्धेमुळे गावकरी सर्व गणेशोत्सवातल्या वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. यामधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी याच पैशांतून हे सण साजरे करतात. अशा प्रकारे उर्से गावाने सामाजिक भावनेतून संघटित व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे.