४,९०९ कामगारांची गावाला रवानगी; पालघर स्थानकातून जौनपूर, वाराणसी, सुलतानपूरला तीन श्रमिक ट्रेन रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:41 AM2020-05-21T03:41:46+5:302020-05-21T03:42:04+5:30
बुधवारी सकाळी १२ वाजता वाराणसीकडे जाणारी पहिली ट्रेन सुटणार असल्याने सकाळपासूनच पालघरच्या आर्यन शाळा मैदानावर मोठी गर्दी जमली होती.
पालघर : जिल्ह्यात अडकलेल्या हजारो कामगारांच्या मागणीवरून त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पालघर स्थानकातून बुधवारी उत्तर प्रदेशच्या जौनपूर, वाराणसी, सुल्तानपूरसाठी तीन श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. यामधून ४ हजार ९०९ कामगारांची रवानगी केली.
बुधवारी सकाळी १२ वाजता वाराणसीकडे जाणारी पहिली ट्रेन सुटणार असल्याने सकाळपासूनच पालघरच्या आर्यन शाळा मैदानावर मोठी गर्दी जमली होती. मात्र ज्या प्रवाशांना तहसीलदार सुनील शिंदे यांच्या सही-शिक्क्याचे कुपन्स वाटप केले होते, त्यांच्याव्यतिरिक्त अन्य मजुरांनी मोठी गर्दी केल्याने आर्यन शाळेच्या मैदानावर जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना जिकिरीचे गेले. नियोजित वेळेनुसार पहिली ट्रेन वाराणसीकडे रवाना झाल्यानंतर हळूहळू तीनही ट्रेन्स रवाना झाल्या. तरीही दीड ते दोन हजार मजूर राहिल्याने त्यांच्यासाठी अतिरिक्त ट्रेन्सची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर यांनी दिली. उद्या (गुरुवारी) दुपारी १२ वाजल्यानंतर प्रतापगड, जौनपूर आणि बदोहीसाठी अन्य तीन ट्रेन्स रवाना होणार आहेत.