२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:37 PM2023-08-29T17:37:57+5:302023-08-29T17:41:02+5:30
तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
मंगेश कराळे -
नालासोपारा - शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे यांना दत्त नगर येथील एका इमारतीच्या घरात अंमली पदार्थ खरेदीसाठी ४ ते ५ जण राजस्थान येथून येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, दत्त नगर येथील दत्त आशीर्वाद इमारतीमधील सदनिका नंबर ३०२ मध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सापळा लावून धाड टाकली. त्यावेळी राजस्थान राज्यातून एम डी विकत घेण्यासाठी आलेले दिनेशकुमार बिश्नोई (३१), सुनिल बिश्नोई (३०), ओमप्रकाश किलेरी (३०), लादूराम बिश्नोई (४०) आणि प्रकाशकुमार बिश्नोई (२३) या पाच बिश्नोई टोळीतील आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींची झडती घेतल्यावर त्यांच्या कब्जात २१० ग्रॅम वजनाचा २१ लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच सात मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, रोख असा एकूण २२ लाख ८ हजार ५१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना घरी बोलावून अंमली पदार्थ विकणारा प्रकाश भादू याच्यावरही गुन्हा दाखल केला असून या फरार आरोपीचा शोध तुळींज पोलीस घेत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, माने, केंद्रे, कदम, छबरीबन यांनी केली आहे.
पाचही आरोपींना मंगळवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - विनायक नरळे (सहाय्यक पोलीस आयुक्त)