वाहन कर्जाद्वारे ‘युको’ला ५ काेटी ४४ लाखांचा गंडा; डीलर, ग्राहकांसह ९२ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:59 PM2024-03-09T13:59:25+5:302024-03-09T13:59:45+5:30
बनावट ग्राहक व बनावट कागदपत्रांद्वारे संगनमताने हा घोटाळा झाल्याचा संशय आहे.
मीरा रोड : मीरा रोडमधील युको बँक शाखेतून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या विविध चारचाकी वाहनांच्या कर्जाची रक्कम न भरता पाच कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांना बँकेची फसवणूक करणाऱ्या कार डीलर व ग्राहक अशा ९२ जणांवर मीरा रोड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे. बनावट ग्राहक व बनावट कागदपत्रांद्वारे संगनमताने हा घोटाळा झाल्याचा संशय आहे.
मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात युको बँकेची शाखा आहे. या शाखेतून १ फेब्रुवारी २०१२ ते ३० नोव्हेंबर २०१२ दरम्यान हा सर्व वाहन कर्ज घोटाळा घडला आहे. या काळात भाईंदर, मीरा रोडसह नवी मुंबई भागातील काही कार डीलर्सच्या माध्यमातून युको बँकच्या या शाखेतून चारचाकी वाहनांची वाहन कर्जे घेण्यात आली होती. या कर्जाची रक्कम ५ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपये इतकी थकीत आहे. ग्राहकांनी वाहन कर्जाचे हप्तेच भरले नाहीत.
बँकेने नंतर कर्ज वसुलीसाठी शोध घेतला असता ग्राहक तर मिळाले नाहीतच, शिवाय वाहनेदेखील सापडली नाहीत. काही कार डीलर्स तर त्यांची दुकाने बंद करून पसार झाले.
ठाणे न्यायालयात बँकेची याचिका
वाहन कर्जात मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेच्या वतीने ठाणे न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी २१ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
अखेर ७ मार्च २०२४ रोजी बँकेच्या वतीने गौरवकुमार सहा यांनी फिर्याद दिल्यावर मीरा रोड पोलिसांनी कार डिलर्सचे मालक व ग्राहक असे मिळून ९२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण वंजारी हे तपास करत आहेत.