सदभाव कंपनीच्या विरोधात चालकांनी केला ५ तास अहमदाबाद हायवे जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:18 AM2017-09-29T03:18:53+5:302017-09-29T03:18:57+5:30
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनीच्या विरोधात गुजरात आणि महाराष्ट्राकडे जाणा-या वाहतूकधारकांनी ५ तास चक्का जाम केला.
- सुरेश काटे ।
तलासरी : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनीच्या विरोधात गुजरात आणि महाराष्ट्राकडे जाणा-या वाहतूकधारकांनी ५ तास चक्का जाम केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. याचा फटका बस चालक, शाळकरी विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना बसला. चक्का जाम केल्याचे समजताच तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली दापचारी तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करताना वाहन धारकाकडून १००० ते ५००० हजार पर्यंत पैसे उकळले जातात, आरटीओ अवैधरित्या वाहने सोडत असून अशा टोळ्या या ठिकाणी सक्रिय आहेत.
दापचरी सीमा तपासणी नाक्यावर दोन्ही बाजूला १२ बूथ आहेत त्याद्वारे सदभाव कंपनी टोल आकारणी करते तर आरटीओ अवजड वाहनांची तपासणी करून अतिररिक्त दंड आकारणी करून चालकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप चालकांकडून करण्यात येत होता. मात्र १२ बूथ पैकी फक्त दोनच बूथ सुरू ठेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागून तिचा मोठा त्रास चालकांना होत होता त्याचाच उद्रेक होऊन आज चक्का जाम करण्यात आले. सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनी अवजड वाहने सेटिंग करून पास करते. परंतु ज्यांची सेटिंग नाही त्यांना अतिरिक्त दंड आकारून त्यांची लूट होत असल्याचा आरोप चालकांकडून होत आहे.
याबाबत वाहन चालक आणि मालकांनी वारंवार तक्रारी करूनही सदभाव कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप आंदोलकांनी केला व १२ पैकी ८ बूथ सुरू करण्याचे लेखी आश्वासन कंपनी देत नाही तोपर्यत चक्काजाम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
आठ बूथ सुरू करण्यात येणार असून या पुढील काळात वाहतूकीचा खोळंबा होणार नाही असे आश्वासन दिल्या नंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच अवजड वाहतूक करणाºया टोळ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच वाहतुकदारांनी वाहतूक सुरू केली.