५ लाखांच्या खंडणीसाठी नालासोपा-यातून अपहरण, तीन खंडणीबहाद्दरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:59 AM2017-10-28T05:59:18+5:302017-10-28T05:59:25+5:30
विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली.
विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. नालासोपारा येथे राहणारे मनमीत उर्फ लकी सुचासिंग बाथ (३८) यांना त्यांचे पुणे येथील परिचयाचे हरिश चव्हाण (४२) याने जव्हार येथील आदिवासी समाज शैक्षणिक व सामाजिक संस्थेसाठी पाच लाख रुपयांची देणगी मागितली होती.
२४ आॅक्टोबर २०१७ रोजी हरिश चव्हाणने मनमीत बाथ यांना पाच लाख रुपये घेऊन तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हरिश चव्हाण परिचयाचा असल्याने बाथ आपल्या विनोद मिश्रा या मित्रासह हरिशला भेटण्यासाठी गेले होते. बाथ यांनी पाच लाख रुपये आणले नसल्याचे सांगताच संतापलेल्या हरिशने आपल्या साथीदारांसह बाथ आणि मिश्रा यांना मारहाण केली. त्यानंतर बाथ यांना एका गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी बाथ यांची सुखरूप सुटका करतानाच खंडणीखोरांना अटक करण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर खैरनार यांनी पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली होती. त्यांनी प्रमुख आरोपी हरिश चव्हाण (४२, रा. कोथरूड), गजानन कवतीकर (२५, रा. बालेवाडी), समीर शेख (२५, रा. येरवडा) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.