सायबर पोलीस ठाण्याने दोघा नागरिकांचे मिळवून दिले ५ लाख
By धीरज परब | Published: January 11, 2024 07:51 PM2024-01-11T19:51:02+5:302024-01-11T19:51:12+5:30
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे राहुल देतराज यांच्या क्रेडिट कार्ड वरून ३ व्यवहार करत सायबर लुटारूंनी ५६ हजार ४७२ रुपयांची फसवणूक केली होती.
मीरारोड - सायबर लुटारूंनी ऑनलाईन फसवणूक करून लुटलेले दोघा नागरिकांचे ५ लाख १ हजार ५८४ रुपये मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे राहुल देतराज यांच्या क्रेडिट कार्ड वरून ३ व्यवहार करत सायबर लुटारूंनी ५६ हजार ४७२ रुपयांची फसवणूक केली होती. त्याबद्दल राहुल यांनी गेल्या वर्षी नोव्हेम्बर मध्ये सायबर पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. सायबर पोलिसांनी व्यवहाराची माहिती घेतली असता क्रेडिट कार्डचे तिन्ही व्यवहार हे परदेशात केले गेले होते. आरबीएल बँके कडे फसवणुकीच्या रक्क्म बाबत पत्र व्यवहार केले. दोन महिने पाठपुरावा केल्या नंतर फसवणुकीची संपूर्ण रक्कम राहुल यांच्या खात्यात वळती करण्यात पोलिसांना यश आले.
दुसरा गुन्हा विरार पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या हेतल पटेल यांच्या बाबतीत घडला होता. सायबर लुटारूंनी ऑनलाईन व्यवहारात त्यांची ४ लाख ४५ हजार ११२ रुपयांची फसवणूक केली होती. गेल्या वर्षी ओक्टोबर महिन्यात पटेल यांचा तक्रार अर्ज सायबर पोलिसांना मिळाला होता. पटेल यांची रक्कम इंडसइंड बँकेत वळती झालेली होती. पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ती रक्कम न्यायालयाच्या आदेशानंतर परत मिळवून दिली.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर सह प्रवीण आव्हाड, सुवर्णा माळी, अमीना पठाण, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, गणेश इलग, पल्लवी निकम यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत गुन्ह्याचा तपास सुरु केला.