पनवेलमधील नशा मुक्ती केंद्रातून ५०-६० जणांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:24 AM2019-04-05T06:24:05+5:302019-04-05T06:24:20+5:30

मारहाणीची भीती : सांगुर्ली येथील हार्मोनी केंद्रातील प्रकार

50-60 people flee from drug addiction center in Panvel | पनवेलमधील नशा मुक्ती केंद्रातून ५०-६० जणांचे पलायन

पनवेलमधील नशा मुक्ती केंद्रातून ५०-६० जणांचे पलायन

Next

मयूर तांबडे

पनवेल : सांगुर्ली येथील हार्मोनी फाउंडेशन, अल्कोलिक अ‍ॅण्ड ड्रग्ज रिअ‍ॅबिलेटेशन केंद्रचालकाविरोधात शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्यांना होणारी मारहाण व उपासमारीच्या भीतीमुळे केंद्रातून ५० ते ६० जणांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवार, १ एप्रिल व बुधवार, ३ एप्रिलदरम्यान केंद्रातून ५० ते ६० जणांनी पलायन केल्याचे उघड झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे असलेले हार्मोनी सेंटर काही महिन्यांपूर्वी सांगुर्ली येथे भाड्याच्या जागेमध्ये हलविण्यात आले आहे. येथे जवळपास १८३ जणांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. २३ मार्च रोजी येथे उपचारासाठी आलेल्या प्रशांत मधुकर पवार याचा मृत्यू झाला होता. या वेळी डॉक्टरांनी त्याच्या छातीच्या बरगडीला दुखापती झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनुसार केंद्रचालकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान, केंद्रात सोमवारी व बुधवारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ५० ते ६० जणांनी पलायन केले. यातील काही जण आपापल्या घरी गेले असून काहींचा पत्ता लागत नसल्याचे समोर आले.
नशा मुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग गाठला व ट्रकला हात दाखवून ते पळस्पे फाटा (जेएनपीटी मार्ग) येथे उतरले. त्यानंतर काहींनी आपल्या घराची वाट धरली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी होत असलेले हाल, मारहाण, अस्वच्छता, खायला न देणे याबाबत कुटुंबाला सांगितले.

या प्रकरणी प्रतिनिधी हार्मोनी नशा मुक्ती केंद्रात गेले असता, आपल्या नातेवाइकाला घेण्यासाठी आलेल्या कुटुंबाने येथील वागणुकीबद्दल माहिती दिली. तसेच एका महिलेने, तिच्या पतीने बुधवारी मारहाण व त्रासाला वैतागून पलायन केले असून याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांचे कुटुंब केंद्रात आले होते. त्यांचे पती सतीश बामुगडे हे ७ महिन्यांपासून येथे उपचार घेत असून त्यांना महिन्याला १० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र, त्या बदल्यात कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जेवणाचे हाल व मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तर मिलिंद सुतार यांनीही याच त्रासाला वैतागून लोखंडी ग्रील तोडून पलायन केले. १० ते १५ जण मिळून उपचारासाठी आणलेल्यांना १ नंबरच्या खोलीत नेऊन जबर मारहाण करत असल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे. येथे औषधे, गोळ्या, कपडेदेखील कधी देत नाहीत. तसेच घरच्यांनादेखील भेटू दिले जात नाही. तर येथे आलेले काही जण आपल्या घरी जात नसत. ते तेथेच राहून इतरांना मार्गदर्शन करायचे. तर या ठिकाणी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले.

संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार
हार्मोनी नशा मुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी धर्मादाय आयुक्त अलिबाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

नोंद ग्रामपंचायतीत करणे गरजेचे
हार्मोनी नशा मुक्ती केंद्राने हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. येथे मृत पावलेल्या नागरिकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी नोंद केलेली नाही.

नेहमी व्हायची मारहाण
काही दिवसांपूर्वी केंद्रातून एक कैची हरविल्याने आम्हाला शिक्षा म्हणून गरम पाण्यात मसाला, मीठ टाकून सोयाबीन खायला द्यायचे. केंद्रात १५ ते २० जण येऊन नेहमी मारहाण करायचे. जेवणात सोडा टाकलेला भात, कच्ची चपाती असल्याने साहजिकच येथील रु ग्ण जेवण सोडून द्यायचे.
- अजित चव्हाण, उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रु ग्ण

Web Title: 50-60 people flee from drug addiction center in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.