भूकंपाने ५२ अंगणवाड्यांना तडे; आदिवासी बालकांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:01 PM2019-06-05T23:01:19+5:302019-06-06T06:25:21+5:30
तलासरी भागात भूकंपाच्या हादऱ्याने अनेक घरांना व अंगणवाड्यांना तडे जात आहेत या बरोबर या भागातील खदानी त मनमानी पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचंड सुरुंग स्फोटानेही घरांना हादरे बसून तडे जात आहेत
तलासरी : तलासरी तालुक्यातील २१ अंगणवाड्या धोकादायक झाल्याने त्या पाडून नवीन अंगणवाड्या बांधण्याचे प्रस्ताव प्रलंबित असताना तलासरी डहाणू भागात सतत होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने अजून ५२ अंगणवाड्यांना तडे गेल्याने त्या धोकादायक झाल्याने आदिवासी बालकांचे जीव टांगणीला लागले आहेत पण याचे सोयरसुतक ना अधिकाऱ्यांना ना पुढाऱ्यांना.
या धोकादायक झालेल्या अंगणवाड्यांचा अहवाल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी तलासरी तहसील कार्यालयाला दिल्यावर महसूल विभागाने ५२ ताडपत्र्या बाल विकास प्रकल्प मध्ये पाठवून देऊन आपली जबाबदारी झटकली. या अंगणवाड्या आता गळणार नाहीत परंतु, त्या कोसळल्या तर यात ताडपत्रीचा काय उपयोग होणार? याचा कोणताही खुलासा महसूल खात्याकडे नाही.
५२ अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या ताडपत्र्यातून तंबू उभारायचे आहेत. संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अंगणवाड्या बाहेर तंबू टाकून भूकंपाचा धक्का बसताच बालके तंबूत बसवायची अशी ही योजना पण तडे गेलेल्या अंगणवाड्यांची दुरूस्तीचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे, या भागात भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर गाव पाड्यात शासना तर्फे तंबू टाकण्यात आले पण ते कुचकामी ठरले आहेत, अन आता अंगणवाड्या तंबूत भरणार असल्याने आदिवासी बालकांचे बालपण तंबूत जाणार आहे.
तलासरी डहाणू भागात होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने जनता हैराण आहे या भूकंपाची कारणमिमांसा करण्यात यंत्रणा अक्षरश: अपयशी ठरली आहे. भूकंपाने या भागातील हजार दीड हजार घरांना तडे गेले आहेत या घरांचे पंचनामे महसूल विभागा मार्फत करण्यात येऊन काही लाभार्थ्यांना सहा हजाराची मदत देण्यात आली पण शासनाने दिलेली मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे,
तलासरी तालुक्यातील धोकादायक झालेल्या २१ अंगणवाड्या या सन १९८५ पासून ते २००५ पर्यंत बांधण्यात आलेल्या असून काही ना ३० वर्षे तर काही अगदी १३ ते १४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पण निकृष्ट कामाने त्या धोकादायक झाल्या आहेत त्या पाडून नवीन बांधण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागा कडे आहेत या पैकी २ अंगणवाड्या बांधण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून १९ अंगणवाड्या चे प्रस्ताव निधीअभावी रखडले आहेत पण या कडे आदिवासींचे पुढारी म्हणवणाºयांचे दुर्लक्ष आहे
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी आनंद जाधव यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की, १९ अंगणवाड्यां च्या जुन्या तोडून नव्या बांधण्याचे प्रस्ताव बांधकाम खात्याकडे प्रलंबित आहेत, तर भूकंपाने तडे गेलेल्या अंगणवाड्या साठी २ ताडपत्री महसूल विभागाने पाठविल्या असून ग्रामपंचतीच्या सहकार्याने तंबू टाकण्यात येतील.
तलासरी भागात भूकंपाच्या हादऱ्याने अनेक घरांना व अंगणवाड्या ना तडे जात आहेत या बरोबर या भागातील खदानी त मनमानी पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचंड सुरुंग स्फोटानेही घरांना हादरे बसून तडे जात आहेत पण खाण मालकांबरोबर असलेल्या आर्थिक हित संबंधामुळे शासकीय यंत्रणा सुरु स्फोटाने झालेले नुकसान भूकंपाच्या नावावर खपवित आहे