वसई-विरारमधून ५९५ जण बेपत्ता
By Admin | Published: July 11, 2016 01:46 AM2016-07-11T01:46:24+5:302016-07-11T01:46:24+5:30
वसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत
शशी करपे , वसई
वसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत. तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झाल्याच्या अधिक तक्रारी दाखल झाल आहेत. यातील काही जणांचा शोध लागलेला असली तरी घरी परत आलेल्यांकडून पोलिसांना कळवले जात नसल्याने बेपत्तांबाबत ठोस माहिती उजेडात येणे कठीण बनत चालले आहे.
वसई तालुक्यात विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपुर, वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५९५ जण गेल्या १८८ दिवसांत बेपत्ता झाले आहेत. तर १७४ जणांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद झाली आहे. त्यात १४ ते १६ या वोगटातील मुली आणि मुलांचीही संख्या जास्त आहे. प्रेम प्रकरणातून यातील अधिक जण बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बेपत्ता प्रकरणातील काही गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे. तर काही बेपत्ता घरी परतत असतात. मात्र, परत आलेल्यांची माहिती पोलिसांना कळवली जात नसल्याने बेपत्ता असलेल्यांचा आकडा दरवर्षी मोठा होत जातो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर बहुतेक मुली प्रेमप्रकरणातूनच घरातून पळुन जात असल्याचे पहावास मिळत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. बेपत्ता आणि अपहरणची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या महिन्यात वसई विरारसाठी स्वतंत्र अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा सुरु करण्यात आली आहे.