जव्हारच्या १९ सजांसाठी ६ कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा तुडवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:07 AM2018-10-26T00:07:36+5:302018-10-26T00:07:56+5:30
तीन मंडळ व १९ सजा असून त्यात जुन्या १४ तर नवीन ५ सजांचा समावेश आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : तालुक्यात तीन मंडळ व १९ सजा असून त्यात जुन्या १४ तर नवीन ५ सजांचा समावेश आहे. तीन मंडळ अधिकाºयांची नेमणूकही प्रभारी मंडळ अधिकाºयांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, या सजांचे कामकाज फक्त सहा तलाठी पाहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जव्हार, जामसर, साखरशेत या मंडळा अंतर्गत जव्हार, कासटवाडी, आपटाळे, कौलाळे, न्याहाळे बु., वाळवंडा, पाथर्डी, मेढा, डेंगाचीमेट, पिंपळशेत, देहरे, तलासरी, वावर, दाभेरी, विनवळ, कोगदा, हिरडपाडा, जामसर अशा एकूण १९ सजाचें कामकाज फक्त ६ तलाठी पाहत असून इतक्या मोठ्या तालुक्याकरीता फक्त ६ कर्मचारी असल्यामुळे शेकडो कामे रेंगाळली आहेत. तसेच, याहून अधिक धक्कादायक म्हणजे या सर्व सजांकरीता कार्यालय उपलब्ध नसून जव्हार शहरातीतल मंडळ कार्यालयातूनच सर्व कारभार सुरू असतो.
दरम्यान, या मंडळ अधिकारी कार्यालयाचीही दुर्दशा झाली असून ही इमारत मुकणे संस्थानकाळातील असून जव्हारच्या महाराजांनी ती शासनाला सुपूर्द केलेली आहे.
मात्र, या वास्तूमध्ये प्रशासनाकडून शौचालय, पाणी आदी प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. तालुक्याचे सीमाक्षेत्र असलेल्या जागांची महत्वांची कागदपत्रे व नोंदी ठेवणारे हे कार्यालय आहे. मात्र त्यासाठी चांगली कपाटे नाहीत, पावसाळ्यात तर गळती लागते. अशा ठिकाणी महत्वाचे दस्ताऐवज कसे ठेवायचे? हा प्रश्न आहे.
>आपत्ती व्यवस्थापनाचा भत्ता लटकलेलाच
महसूल विभागाच्या नवनवीन योजना येत असतात. या सर्व योजनांचा अतिरिक्त भारही या तोकड्या कर्मचाºयांवर सोपवला जात आहे. मध्यंतरीच्या काळात वसई तालुक्यात अतिक्रमण पाहणीसाठी व पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाकाजासाठी जव्हार तलाठी कार्यालयाचे सर्व कर्मचारी व मंडळ अधिकाºयांची नेमणूक तब्बल महिनाभरासाठी करण्यात आली होती. याकामाचा प्रवासी भत्ता व मानधन अद्याप या कर्मचाºयांना मिळालेला नाही. पदरमोड करून हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी कार्यालय चक्क कोतवालाच्या भरवशावर सुरु होते. अधूनमधून तर कार्यालयीन वेळेत कार्यालयाला कुलूप असायचे अशा वेळी येथील भोळीभाबडी गरीब आदिवासी जनता आपली पदरमोड करून तलाठी कार्यालयाच्या बाहेर तासंतास रखडून माघारी फिरत होती.