विरार ते नायगाव दरम्यान ६ फ्लायओव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:26 PM2019-06-16T23:26:24+5:302019-06-16T23:26:41+5:30
प्रवासाचे अंतर होणार कमी; वाहतूक कोंडीपासून नागरिकांची होणार मुक्तता
नालासोपारा : वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, येणाºया वर्षांमध्ये महानगरपालिका विरार ते नायगाव या अंतरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधणार आहेत. या पुलांच्या बाबतीत महानगरपालिकेने एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. या पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोंटींचा खर्च येणार आहे. या फ्लायओव्हरमुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्या-जाण्यासाठी प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून भविष्यात वाहतूक कोंडीपासूनही सुटका होणार आहे.
वसई विरार मधील जनतेच्या सोयीसुविधांच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरा दरम्यान सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावात विरार ते कोपरी, नारंगी, विराट नगर, नालासोपारा येथील ओस्तवाल नगरी, अलकापुरी, वसईच्या उमेळमान येथील पूर्व ते पश्चिम असे सहा नवीन पूल बांधणार आहे. नायगाव येथे एका पुलाचे काम अर्ध्याच्या वर झालेले असून लवकरच तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे नायगाव परिसरात राहणाºया नागरिकांचा फायदा होणार आहे.
भविष्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार, नालासोपारा आणि वसई याठिकाणी तीन फ्लायओव्हर आहेत. विरारच्या पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस निर्बंध असल्याने नारंगी फाटा येथील रेल्वे फाटकावरून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहनांना येजा करावी लागते. नालासोपारा येथील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. संध्याकाळच्या सुमारास अवजड वाहनांच्या येण्याजाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी दररोज होत असून जनतेची व वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर वसई येथील पूर्व आणि पश्चिम प्रभाग जोडणारा जुना पंचवटी पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला असून नवीन पुलावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी होत असते.
या ठिकाणी मिळणार सुविधा.....
नवीन पुलांची निर्मिती झाल्यावर वसई विरारमधील जनतेला अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. पूर्वेकडील प्रभागातून पश्चिमेकडील प्रभागात येणाºया जाणाºया नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून येण्याजाण्यासाठी लागणाºया गाडी भाड्यातही कपात होणार आहे.
अनेक ठिकाणे रेल्वे स्थानकांच्या समोरासमोर आहेत. पण दुरून वळसा घालून त्याठिकाणी जावे लागते. पण आता हे ही अंतर कमी होणार आहे. विरार, नालासोपारा आणि वसई पश्चिमेकडील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मॉल, थिएटर, समुद्रे किनारी येण्याजाण्यासाठी नागरिकांना लांबचा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे वाहतुककोंडीच्या समस्येपासून सुटका होणार !
प्रस्तावित पुलांच्या ठिकाणी अतिक्र मण....
ज्या ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. त्यांच्या उभारणीत अनेक अडचणी सुद्धा आहे. भविष्यात उभ्या राहणाºया पुलांच्या जागेत अतिक्र मणे झाली असून काहींनी कब्जा केल्याचेही दिसून येत आहे. हे अतिक्र मण हटविण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्तावित खर्चाच्या रकमेत वाढ होणार आहे. यामुळे काही ठिकाणी विरोधही केला जाईल ही गोष्ट नाकारता येत नाही.
प्रवास होणार सुकर,
नायगाव आणि वसई पश्चिमेकडे येण्यासाठी महामार्गावरून सातीवली, रेंजनाका, पंचवटी पूलावरून वसई, नायगाव येथे यावे लागते. नायगाव पूर्वपश्चिम जोडणारा पूल साकारला तर अंदाजे २५ किलोमीटरचे अंतर कमी होणार तर लोकांना नायगाव पूर्वेकडून नायगाव आणि वसई पश्चिमेकडे जाण्यासाठी लागणाºया वेळेची बचत होऊन इंधन देखील वाचणार आहे. या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. वसई पश्चिमेकडील न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, आरटीओ, टीएलआर कार्यालयात येणाºया जाणाऱ्यांच्या वेळ व इंधनाची बचत होईल, तसेच वाहतूककोंडीची समस्याही सुटेल.
वसई विरार मधील जनतेच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेतला असून एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोटींचा खर्च लागणार आहे.
- राजेंद्र लाड (मुख्य कार्यकारी अभियंता, वसई विरार शहर महानगरपालिका)