वसई तालुक्यात ८ महिन्यांत ६१ बलात्कार
By admin | Published: October 2, 2016 03:07 AM2016-10-02T03:07:56+5:302016-10-02T03:07:56+5:30
वसई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बलात्काराचे ६१ आणि विनयभंगाचे ७९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे तुळिंज पोलीस
विरार : वसई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बलात्काराचे ६१ आणि विनयभंगाचे ७९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे तुळिंज पोलीस ठाण्यात घडले आहेत. त्यामुळे वसईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वसई तालुक्यातील विरार, नालासोपारा, तुळिंज, वालीव, माणिकपूर, अर्नाळा, वसई या पोलीस ठाण्यांच्या परिसरात विनयभंग आणि बलात्काराच्या घटना वाढू लागल्याने महिला, मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत विनयभंगाच्या ७९ आणि बलात्काराच्या ६१ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीही वासनेला बळी पडल्या आहेत. काही घटनांमध्ये महिला आणि मुलींना त्यांचा विश्वास संपादन करून, एकांतात नेऊन, जेवणात आणि शीतपेयात गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपी फरार झाले आहेत. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.वसई पोलीस ठाण्यात २, विरारमध्ये ९, माणिकपूरमध्ये ४, नालासोपाऱ्यात ३, वालीवमध्ये १४, तुळिंजमध्ये २४ आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात ५ मिळून बलात्काराचे एकूण ६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ गुन्हे घडले आहेत. (वार्ताहर)