विकास आघाडीचे ७ उमेदवार बिनविरोध
By admin | Published: December 28, 2016 04:14 AM2016-12-28T04:14:01+5:302016-12-28T04:14:01+5:30
या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती.
विक्रमगड : या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती. परंतु सर्वच उमेदवार बिनविरोध झाल्याने आता ६ जानेवारीनंतर नव्या चेअरमनची निवड होणार आहे. एकुण ११ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अनुसुचित जमातीचे मधुकर खुताडे व भटक्या/विशेष मागासप्रवर्गातील प्रविण संखे हे दोघे अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत़ उर्वरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी-६ जागा, ओबीसी-१, महिला राखीव-२ अशा ९ जागांकरीता २४ उमदेवार रिंगणात होते. त्यापैकी २२ डिसेबर रोजी माघारीच्या दिवशी काही सदस्यांनी माघार घेतल्याने विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या १५ सदस्यापैकी ७ उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत़ त्यामुळे साहजिकच विक्रमगड नगरपंचायतीप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकीमध्येही विकास आघाडीची सरशी झाली आहे.
दरम्यान गेल्या ३५ वर्षात या संस्थेची निवडणूकच झाली नव्हती़ प्रत्येकवेळी आपसांत संगनमत करुन चेअरमनपद एकाच व्यक्तीने भूषविलेले आहे़ मात्र यावेळी निलेश सांबरे, प्रमोद पाटील व नितीन वाडेकर यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनल उतरविल्याने विरोधकांनी माघार घेणे पसंत केले त्यामुळे विकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध विजयी झाले.
या संस्थेमध्ये एकुण मतदार सभासद संख्या ७१५ अशी मोठयास्वरुपाची आहे़ मात्र त्यामधील जवळ जवळ ६२० सभासद हे मयत आहेत़ त्यामुळे येवढया मोठयाकालावधीमध्ये मयतांचे वारस चढविण्यात आलेले नाही़ थातूर मातूर आॅडीट केले जात असल्याने हा प्रश्न कधी सभासदांच्या समोर आलाच नव्हता़ आॅडीटरने प्रत्येकवेळी मयतांचे वारस नोंदविण्याची सूचना केल्या असतांनाही आजतगायत वारस नोंद झालेली नसल्याने अनेक वारस सभासद या निवडणुकीपासून मुकलेले आहेत़ सध्या ७१५ पैकी फक्त ७० ते ८० सभासद जिवंत आहेत़
या संस्थेची ३५ वर्षानंतर प्रथम निवडणूक घेण्यात येत आहे़ यावेळी निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीच्या माध्यमातुन या संस्थेवर १५ उमदेवार देऊन निवडणूक घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ३५ वर्षाची संगनमताने बिनविरोध विजयी होण्याची परंपरा मोडीत निघाली़ आता एकुण ११ जागांपैकी ७ जागेवर विकास आघाडीने विजय श्री मिळवला असल्याने एकंदरीत या निवडणुकीवर विकास आघाडीचा प्रभाव स्पष्ट आहे़ (वार्ताहर)