तुळींजमध्ये ७ सराईत गुन्हेगार १ व २ वर्षासाठी तडीपार, तुळींज पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:10 PM2024-07-17T16:10:50+5:302024-07-17T16:11:04+5:30
तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा : तुळींज पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ७ सराईत गुन्हेगारांना बुधवारी १ व २ वर्षासाठी तडीपार केले आहे. या ७ गुन्हेगारांमध्ये एका महिलेचाही सहभाग आहे. तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता तुळींज पोलिसांनी कंबर कसली आहे. या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांकडून तुळींज पोलीस ठाण्यात वास्तव्यात असलेले व गुन्ह्यात सक्रिय, उपद्रवी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरू केली आहे. आगामी असलेल्या सणावारांच्या काळात कोणतीही अप्रिय घटना न घडण्यासाठी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी गुन्हेगारांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
आमिर अन्सारी उर्फ पठाण (२३), नरेंद्र शर्मा (२५), गायत्री तिवारी, रिझवान खान (२९) या चौघांना २ वर्षासाठी तर इस्लाम शेख (४४), राजेशकुमार पांडे (४६) आणि समरजित विश्वकर्मा (५६) या तिघांना १ वर्षासाठी जवळच्या पाच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तुळींज या पोलिस ठाण्यांवर उपायुक्तांनी लक्ष केंद्रित केले असून, समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, दत्तात्रय पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पाटील, पोलीस हवालदार अनिल शिंदे, अशोक तांडेल, आकाश वाघ यांनी केली आहे.
वाढती गुन्हेगारी बघता पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी ४ आरोपींना २ तर ३ आरोपींना १ वर्षासाठी ५ जिल्ह्यांतून बुधवारी तडीपार केले आहे.
शैलेंद्र नगरकर
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)