पालघर जिल्ह्यातील ७१ गावे पेसा घोषित, विकासाची नवी पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:26 AM2017-08-20T03:26:56+5:302017-08-20T03:26:56+5:30
या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता.
पालघर : या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता. पंचायत विस्तार कायद्यानुसार आदिवासींच्या विकासाला चालना मिळावी तसेच त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यान्वये जिल्ह्यातील पाडे, पाडयांचे समूह वाडी, वाड्याचे समूह वस्ती, पेसा गावे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार या ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
याअंतर्गत डहाणू तालुक्यातील गंजाड आणि जामशेत ग्रामपंचायत मधील ३ गावांचा समावेश करण्यात आला असून तलासरी तालुक्यातील काजळ, वरवंडा व डोंगरी ग्रामपंचायतीच्या २० गावांचा समावेश आहे
तर वसई तालुक्यातील भाताणे, गोमन, तिल्हेर , शिवणसाई, टोकरेखैरपाडा, पोमण, पारोळ, आडणे भिनार, माजीवली, करंजोळ ,सायवन, मेढे, सकवार अशा १३ ग्रामपंचायतीमधील ४८ गावांचा समावेश आहे.
पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या या गावांना यापुढे स्वतंत्र ग्रामसभा घेता येणार आहे. स्वत:चा ग्रामसभा कोष, लघु पाणी साठयाचे नियोजन करणे, गौण खनिजांचे नियोजन, अनुसूचित जमातीच्या जमिनींचे अतिक्र मण केलेली जमीन परत मिळवून देण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत.
पाच टक्के निधी थेट खात्यात होणार जमा
पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रामध्ये मोडत असलेल्या जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीतील पाड्यांना आणि ग्रामसभाना त्यांचे विशेष अधिकार आणि नैसर्गिक साधन संपत्तीची खरी मालकी तसेच तिचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे .अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध होणाºया निधीपैकी आदीवासी उपयोजनेकरिता ५ टक्के निधी सर्व पेसा गावांच्या थेट खात्यात जमा करण्यात येईल.