आंदोलनाला यश ! अखेर 711 रुग्णालयात पालिकेचा स्वतंत्र दवाखाना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 05:36 PM2019-01-19T17:36:32+5:302019-01-19T17:38:23+5:30
पालिकेच्या आरक्षणात बांधलेल्या भाईंदरच्या ७११ रुग्णालयातील पालिकेचा दवाखाना अखेर शनिवारी (19 जानेवारी) सकाळपासून सुरू करण्यात आलाय.
मीरा रोड - पालिकेच्या आरक्षणात बांधलेल्या भाईंदरच्या ७११ रुग्णालयातील पालिकेचा दवाखाना अखेर शनिवारी (19 जानेवारी) सकाळपासून सुरू करण्यात आलाय. त्यामुळे तब्बल १४ दिवसांपासून दवाखाना सुरू व्हावा म्हणून साखळी उपोषणास बसलेल्या जिद्दी मराठा प्रतिष्ठान आणि सत्यकाम फाऊंडेशनने आंदोलन मागे घेतले. तब्बल सहा वर्षांनी नागरिकांना पालिकेचा हक्काचा दवाखाना मिळाला आहे. पहिल्या दिवशी ४० जणांनी वैद्यकिय सुविधेचा लाभ घेतला. या आंदोलनामुळे पालिका आयुक्तांसह भाजपा आमदार, महापौरांवर टीकेची झोड उठली होती.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांच्या संबंधितांच्या ७११ कंपनीने सेव्हन स्क्वेअर शाळेसमोर पालिका आरक्षणात बांधलेल्या रुग्णालयातील दोन मजली भाग महापालिकेला बांधून द्यायचा होता. परंतु २०१३ पासुन ७११ रुग्णालय सुरू केले पण पालिकेला जागा न दिल्याने दवाखाना व प्रसुतीगृह सुरु झाले नव्हते. या विरोधात आंदोलन व लोकायुक्तांकडे तक्रारी नंतर गेल्या ऑगस्टमध्ये जागा पालिकेला हस्तांतरीत झाली. पण दवाखाना, प्रसुतीगृह मात्र सुरु केले जात नव्हते.
६ जानेवारी पासुन संस्थेचे प्रदीप जंगम सह सत्यकामचे कृष्णा गुप्ता आदींनी पालिके बाहेर साखळी उपोषण सुरू केले. त्याला शिवसेना, काँग्रेस, श्रमजीवी संघटना, बविआ, कम्युनिस्ट, जनता दल (से.), समाजवादी पार्टी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन सह संस्था व नागरीकांनी पाठींबा दिला. सोशल मीडियासह आंदोलन सतत उग्र बनत गेलं.
१४ जानेवारी रोजी दवाखाना सुरू करण्याचे पालिकेने लेखी दिलेले आश्वासन सुद्धा सत्ताधा-यांच्या दबावाखाली सुरु केले गेले नाही. तर ७११ कं. कडून अंतर्गत लाद्या, रंगकाम, वायरींग तसेच स्वच्छता गृहाचे कामच पालिकेने करुन घेतले नसल्याचे उघड झाले.
दुसरीकडे आंदोलनामुळे आयुक्तांसह सत्ताधारी भाजपा, आमदार, महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठू लागली. अखेर शनिवारी सकाळी तळमजल्यावर लाकडी पार्टिशन टाकून पालिकेने दवाखाना सुरु केला. पालिकेने दवाखाना सुरु केल्याने आंदोलकांसह समर्थक नागरीकांनी दवाखान्यात जाऊन पालिकेची पावती फाडत वैद्यकिय तपासणी करुन घेतली. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पालिकेचा दवाखाना सुरु झाल्याने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक, रामदेव पार्क, क्विन्स पार्क, कनकिया आदी भागातील लोकांना नाममात्र शुल्कात बाह्योपचारची तसेच लसीकरणाची सुविधा मिळणार आहे. तर येथे पालिकेचा फलक लावण्यात आला असून वेळ आदी माहितीचा फलक सुद्धा लावला जाणार आहे.