भाईंदर मधून म्यानमारच्या ८ नागरिकांना अटक
By धीरज परब | Published: February 28, 2024 08:09 PM2024-02-28T20:09:35+5:302024-02-28T20:09:56+5:30
ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता उद्या गुरुवार पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
मीरारोड- भाईंदरच्या चौक जेट्टी येथून पकडण्यात आलेल्या म्यानमारच्या ८ नागरिकांना गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून उत्तन सागरी पोलिसांनी म्यानमार दूतावासशी संपर्क साधून सदर नागरिकां बद्दल माहिती मागवली आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ , उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड , सहायक उपनिरीक्षक संजय कोंडे सह अमोल कासार, स्वप्नील बेलेकर , गजानन तोटेवाड यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चौक जेट्टी येथून म्यानमारच्या ८ नागरिकांना पकडून मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता . चौक जेट्टी येथे हे सर्व जमून गप्पा मारत बसले होते . ते हिंदी भाषेत बोलत होते . पोलिसांना पाहून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते . हे सर्व २३ ते ५५ ह्या वयोगटातील पुरुष आहेत .
ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता उद्या गुरुवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्या करता लागणारा कोणताही वैद्य पुरावा सापडलेला नाही. हे सर्व रोहिंग्या असून त्यांची चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. अटक म्यानमारच्या नागरिकांनी आपण शरणार्थी असून कामाच्या शोधात होतो असे सांगितले असल्याने पोलिसांनी म्यानमारच्या दूतावास कडे संपर्क साधून माहिती मागवली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड करत आहेत.