औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:50 PM2024-07-06T16:50:08+5:302024-07-06T16:51:00+5:30
२ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणाऱ्या ८ दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ७२ तासांत अटक केले आहे. या ८ दरोडेखोरांमध्ये २ भंगारवाले असून आरोपींकडून चोरी केलेला २८ लाखांच्या मुद्देमालासह ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. आठ आरोपीपैकी ३ आरोपींवर दरोडा, आर्म्स ऍक्ट आणि २ आरोपींवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ नालासोपारा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये मनिचा पाडा येथे नेमिकाब केबल इंडस्ट्री आहे. येथे कॉपर कॉइल तयार केली जाते. २ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते. या कंपनीतील २८ लाख रुपये किंमतीची तांब्याची कॉईल लुटून फरार झाले होते. दरोडेखोरांनी ट्रकमध्ये संपूर्ण माल भरून नेला होता. निघताना त्यांनी ओलिस ठेवलेल्या चौकीदार व कर्मचाऱ्यांची सुटका केली होती. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी ३ जुलैला दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये रात्रौदरम्यान दरोड्याचा गंभीर गुन्हा असल्याने वरिष्ठांनी सूचना व आदेशानुसार गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व माहितीवरून आरोपींना बदलापूर, भिवंडी येथून अटक केली आहे.
आरोपी रियाजुल शेख (३७), ईशान शेख (४१), राजू विश्वकर्मा (३६), विजय वाख (३९), सलीम अन्सारी (४०) आणि भंगारवाले कुणाल जाधव (३०), सद्दाम मनिहार (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीकडून पोलिसांनी २८ लाखांचे रॉ कॉपर केबलचे बंडल, २५ हजारांचा टेंपो, ५ हजारांची कार, ५० हजारांची दुचाकी आणि १ लाख ५९ हजारांचे मोबाईल फोन असा एकूण ६० लाख ९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सलीम अन्सारी उर्फ हकला याच्यावर ४ दरोडे, आर्म्स ऍक्ट, ईशान शेखवर १ दरोडा व आर्म्स ऍक्ट, राजू विश्वकर्मा १ दरोडा व आर्म्स ऍक्ट, विजय वाख आणि कुणाल उर्फ शिवराम खडके या दोघांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, यूवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.