जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 800 लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 03:04 AM2021-01-13T03:04:44+5:302021-01-13T03:05:00+5:30

जिल्ह्यात आठ केंद्रे : कोरोनायोद्धे लसीकरणास सज्ज

800 beneficiaries in the first phase in the district | जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 800 लाभार्थी

जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 800 लाभार्थी

googlenewsNext

हितेन नाईक

पालघर : जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभागातील कोरोनायोद्ध्याना १६ जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ केंद्रातून पहिल्या टप्प्यात ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करून प्रारंभ होणार आहे. 

डहाणू तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील कासा उपजिल्हा रुग्णालयात दोन केंद्रे उभारली आहेत. पालघर नगर परिषद क्षेत्रातील सर जे.जे. रुग्णालयाच्या आरोग्य पथक केंद्रात (हेल्थ युनिट) एक केंद्र उभारण्यात आले आहे, तर तलासरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी जव्हार तालुक्यात नगर परिषद क्षेत्रातील पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयात एक केंद्र उभारण्यात आले आहे. तर वाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एक लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

निगराणीखाली होणार अंमलबजावणी

१६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे.

अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या निगराणीखाली त्या त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

दुसऱ्याही टप्प्यातल्या लसीकरणासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी सांगितले. 

प्रत्येक केंद्रावर १०० जणांना डोस
वसई महापालिका क्षेत्रात विरार ग्रामीण रुग्णालयात एक तर वसईतील औद्योगिक वसाहतीतील वरुण इंडस्ट्रीज येथे अन्य एका लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर त्या कार्यक्षेत्रातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे.  

आठही ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था  
जिल्ह्यातील आठही ठिकाणी ही लस ठेवण्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस तपमानात ठेवण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये लसीकरणाबाबत सर्व सोपस्कार पूर्णपणे पार पडले आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण न येता जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
    - डॉ. अनिल थोरात
    जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर 

 

Web Title: 800 beneficiaries in the first phase in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.