जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:03 AM2021-01-30T01:03:36+5:302021-01-30T01:03:46+5:30

सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकादरम्यान असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.

87% vaccination in the district, promising move towards the target; The belief of the Corona Warriors | जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

Next

हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५ हजार ६०० टार्गेटपैकी ४ हजार ८२७ लसी देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात ८७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. या जीवघेण्या आजारात एक हजार १९७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी मोठी चिंता व्यक्त होत होती. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्यसेवेतील कोरोनायोद्ध्यांना अगोदर लसीकरण केले जात आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार, लसीकरण केले जात असून आतापर्यंत ४ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे. आरोग्यसेवकांना, डाॅक्टर्स तसेच अन्य कोरोनायोद्ध्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून लसीकरण करून घेतल्यामुळे एवढे चांगले यश मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळापासून पालघर जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, डॉ. केळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. सागर पाटील, डॉ. मिलिंद चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक काम करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकादरम्यान असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण 
करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यात समाधानकारक काम सुरू
सध्या जिल्ह्यात समाधानकरीत्या काम सुरू आहे. लसीकरणाबाबत कुठूनही नकार नाही. लसीकरणादरम्यान ताप येणे अशा किरकोळ इन्फेक्शनव्यतिरिक्त कुठलीही बाधा झालेली नाही.-  डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

३३ हजार डोस प्राप्त
१६ जानेवारी रोजी लसीकरणाच्या सुरुवातीला जिल्ह्याला १९ हजार ५०० डोसचा साठा मिळाला होता. दुसरा १३ हजार ३०० डोसचा साठा प्राप्त झाला आहे. एकूण ३३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

लसीकरणात महिला ६० टक्के
आरोग्यसेवेतील नर्स आणि सिस्टर आदी महिलांचे प्रमाण आरोग्यसेवेत जास्त असल्याने ६० टक्के महिलांचे लसीकरण झालेले आहे.

Web Title: 87% vaccination in the district, promising move towards the target; The belief of the Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.