वसई येथील अपघातग्रस्त कुटुंबास ९३ लाखांची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:26 AM2019-12-19T05:26:01+5:302019-12-19T05:26:08+5:30
गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वळिव नाक्यावरील किचन गार्डन हॉटेलजवळ सात वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या बिनोद पांडे या व्यावसायिकाच्या कुटुंबास मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे ९३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई सन २०१२ पासूनच्या आठ टक्के व्याजासह असल्याने पांडे यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात सुमारे दीड कोटी रुपये मिळतील.
गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तो टँकर पेल्हार येथील हकीम हरून खान यांच्या मालकीचा होता व त्याचा विमा युनायटेड इंडिया अॅश्युरन्स कंपनीने उतरविला होता. या अपघाती मृत्यूबद्दल पांडे यांच्या विधवा पत्नी कुंती व राहुल (१६ वर्षे), अमर (१२) आणि अंजली (८) या मुलांनी केलेल्या दाव्यात वसई येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ८९.७५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. नोटीस काढूनही टँकरमालक किंवा विमा कंपनी हजर न झाल्याने तो दावा एकतर्फी निकाली काढला गेला होता.
भरपाईचा हा निकाल रद्द करून घेण्यासाठी विमा कंपनीने तर भरपाई वाढविण्यासाठी पांडे कुटुंबियांनी अशी दोन अपिले उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्या. रमेश धानुका यांनी अंतिम सुनावणीनंतर विमा कंपनीचे अपील फेटाळले व पांडे कुटुंबियांचे अपील मंजूर करून भरपाईच्या रकमेत वाढ केली. सज्ञान झाल्यानंतर तिन्ही मुले भरपाईची रक्कम काढून घेऊन तिचा हवा तसा विनियोग करू शकतील.
या अपघातास टँकरचा ड्रायव्हर एकटा जबाबदार नव्हता. पांडे यांचीही त्यात चूक होती. त्यामुळे मुळात त्यांचे कुटुंब भरपाई मिळण्यासच पात्र नाही इथपासून ते भरपाईचा हिशेब चुकीने केला गेला आहे इथपर्यंत अनेक मुद्दे विमा कंपनीने अपिलात मांडले. परंतु ते अमान्य केले गेले.