डहाणूमध्ये ९ वी प्रवेशाचा प्रश्न बनला बिकट
By admin | Published: July 9, 2017 01:15 AM2017-07-09T01:15:32+5:302017-07-09T01:15:32+5:30
नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. शाळकरी मुलांची नवे दप्तर, नवी पुस्तके नवे मित्र याची नवलाई आता संपली असून अभ्यासाचे वेध विद्यार्थ्यांना
- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. शाळकरी मुलांची नवे दप्तर, नवी पुस्तके नवे मित्र याची नवलाई आता संपली असून अभ्यासाचे वेध विद्यार्थ्यांना लागले असतांना तालुक्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. दरम्यान, शिक्षण विभागाच्या सूत्रांनी हा आकडा २६० एवढा असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर कोणी प्रवेश देता का प्रवेश असे म्हणण्याची केविलवाणी अवस्था झाली आहे.
इयत्ता नववीला दहावीच्या पूर्वतयारीचे वर्ष मानले जाते. शहरी भागातील विद्यार्थ्यांनी तर आतापर्यंत महागड्या क्लासेसमध्ये दोन्हीही वर्षाची फी भरून अभ्यास सुरू केला असतांना तालुक्यात एक हजार विद्यार्थी नववीच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
यावर्षी नववीच्या अभ्यासक्रम बदलल्यामुळे नवीन पुस्तके बाजारात आली आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण, तुकड्यांची कमतरता यातून मार्ग काढीत डहाणू गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवित सामाजिक कार्यात आपला वाटा देणार्या डहाणूतील रिलायंन्स एनर्जी या उद्योग समूहाशी वाटाघाटी करून कासा येथील आचार्य भिसे विद्यालयात सुमारे १५० विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षक नेमून शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असले तरी त्याला मर्यादा पडत आज तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असूनही १००० पेक्षा अधिक विद्यार्थी शाळेचे उंबरठे नववीच्या प्रवेशासाठी झिजवित आहेत. त्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पेसा जिल्ह्यासाठी विशेष कोटा मंजूर करून विद्याथ्यांची वणवण थांबवावी अन्यथा रस्त्यावरील शाळा हा उपक्र म सुरू करून पालकमंत्री सवरा यांना घरचा अहेर देण्याचा इशारा अनेक आदिवासी संघटनांनी दिला आहे.