उत्तन येथे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ५ वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू
By धीरज परब | Published: July 17, 2024 07:57 PM2024-07-17T19:57:38+5:302024-07-17T19:58:07+5:30
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागात एका खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ५ वर्षाच्या बालकाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागात एका खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ५ वर्षाच्या बालकाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर (वय ५ वर्ष) हा त्याच्या आईसह उत्तनच्या धावगी डोंगरा खाली रहात असलेल्या त्याच्या आजी कडे काही दिवसांपूर्वी आला होता. बुधवारी किरण हा बाहेर खेळायला गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ होऊन देखील मुलगा न आल्याने त्याची आई, मावशी आदी नातलग त्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी एका घराच्या लगत पावसाळी पाणी साचून झालेल्या डबक्याच्या बाहेर त्याची चप्पल दिसून आले.
किरण हा पाण्यात बुडाला असल्याचा संशय आल्याने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांनी डबक्यात शोध घेतला असता किरण याचा मृतदेह सापडून आला. त्याचा मृतदेह भाईंदरच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी दिली. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात जीवाचा धोका लक्षात घेता अश्या जीवघेण्या ठिकाणांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.